Breaking News

लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी रणजित बर्गे, प्लॅटिनमच्या अध्यक्षपदी सविता ढवळे तर वेलनेस वॉरिअर्सच्या अध्यक्षपदी राजेंद्र कोठारी

Ranjit Barge is the president of Lions Club, Savita Dhawale is the president of Platinum and Rajendra Kothari is the president of Wellness Warriors

      फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. १ जुलै २०२६ : लायन्स मुधोजी नेत्र रुग्णालय, माळजाई उद्यान, लायन्स पतसंस्था यासारख्या अनेक कायम स्वरुपी सेवा प्रकल्पांसह संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांना अन्नदान व वैद्यकीय मदत आणि शैक्षणिक, वैद्यकीय उपक्रमासह लोकांच्या अपेक्षा जाणून घेऊन त्यांना मदत व मार्गदर्शन करणार्‍या फलटण लायन्स क्लबने गेली ५८ वर्षे सतत सेवा कार्यात अग्रेसर राहून लायन्स ३२३४ डी-१ या प्रांतातील सर्वोत्कृष्ट क्लब असा नावलौकिक प्राप्त केल्याचे गौरवोद्गार माजी प्रांतपाल आणि पदग्रहण व शपथदाते पीएमजेएफ लायन भोजराज नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

    हॉटेल साईरत्न, फरांदवाडी, ता. फलटण येथे संपन्न झालेल्या लायन्स क्लब फलटण, लायन्स क्लब फलटण प्लॅटिनम, लायन्स क्लब फलटण वेलनेस वॉरिअर्स या क्लबचे सन २०२६-२७ वर्षासाठी नूतन अध्यक्ष, सचिव, खजिनदार व अन्य पदाधिकार्‍यांचा पदग्रहण समारंभ थाटात संपन्न झाला, यावेळी मार्गदर्शन करताना लायन भोजराज नाईक निंबाळकर बोलत होते. इंडक्शन ऑफिसर व द्वितीय उपप्रांतपाल (२०२६-२७) पीएमजेएफ लायन मंगेश दोशी, रिजन चेअरमन एमजेएफ लायन सौ. निलम पाटील, झोन चेअरमन लायन जगदिश करवा, रिजन चेअरमन (इलेक्ट) लायन महेंद्र कदम, झोन चेअरमन (इलेक्ट) लायन सौ. संध्या गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. लायन्स क्लब एमआयडीसी साताराचे राजेंद्र मोहिते, लायन्स क्लब कोल्हापूरचे ला. प्राचार्य सर्जेराव पाटील, लायन्स क्लब सातारा युनायटेडचे ला.बाळासाहेब शिरकांडे, ला.नरेंद्र रोकडे, ला.अनिल कदम, ला.शशिकांत पाटील, लायन्स क्लब सह्याद्रीचे अध्यक्ष कासकर, लायन्स क्लब सातारा अजिंक्यचे ला.डॉ.बापुसाहेब सावंत यांच्यासह फलटण मधील तिन्ही क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    १०९ वर्षापुर्वी सेवाकार्यासाठी स्थापन झालेल्या लायन्स इंटरनॅशनल या सेवाभावी संस्थेचे जगातील २१० देशामध्ये ५२ हजार क्लब्ज व १४ लाख सभासद असून या संस्थेद्वारे जगभरात विविध सेवाकार्ये राबविली जात असून यामध्ये मुख्यत्वे अंधत्व निवारण, बालपणीचा कॅन्सर निवारण, भुकेलेल्यांना अन्न, मधुमेह निवारण, युवाशक्ती, पर्यावरण, आपत्कालीन मदत, मानवतावादी प्रयत्न यांचा समावेश असल्याचे निदर्शनास आणून देत लोकसहभागातून ही सर्व सेवाकार्ये सुरु असून त्यामध्ये फलटण लायन्स क्लबचा मोठा वाटा असल्याचे पीएमजेएफ लायन भोजराज नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

    लायन्स क्लब फलटणच्या माध्यमातून अंधत्व निवारणामध्ये लायन्स क्लब फलटणचे भरीव योगदान आहे. लायन चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत कार्यरत असलेले अद्ययावत लायन्स मुधोजी नेत्र रुग्णालय आज सर्व आधुनिक उपकरणांसह सुसज्ज असून गेली २७ वर्षे नेत्र तपासणी, उपचार, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटप आदी  सेवाकार्य करित आहे. लायन्स नागरी सहकारी पतसंस्था ही संपूर्ण भारतातीत एकमेव लायन्स पतसंस्था असून त्या माध्यमातून उत्तम अर्थकारणाचा परिपाठ घालून देत या संस्थेचे कामही उत्तम प्रकारे सुरु आहे, तसेच फलटण शहरातील सर्व नागरिकांचे श्रध्देचे व आवडते ठिकाण लायन्स माळजाई उद्यानाचे आज लायन्स माळजाई उद्यान समितीच्या माध्यमातून सुशोभिकरण व अद्यावतीकरण करण्यात आले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

    प्रथमतः लायन भोजराज नाईक निंबाळकर यांनी लायन्स क्लब फलटणचे नूतन अध्यक्ष ला. रणजित बर्गे, सचिव ला. प्रमोद निंबाळकर, खजिनदार ला. दिलीप शिंदे, लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या अध्यक्ष ला. सविता ढवळे, सचिव ला. प्रितम पाटील, खजिनदार ला. प्रियंका शिंदे तसेच लायन्स क्लब फलटण वेलनेस वॉरिअर्सचे अध्यक्ष ला. राजेंद्र कोठारी, सचिव ला. स्वप्निल शहा, खजिनदार ला. पंकज दोशी व तिन्ही क्लबचे पदाधिकारी यांना शपथ देऊन त्यांनी करावयाची कामे व त्यांची जबाबदारी याची सविस्तर माहिती देऊन त्यांना लायन्स इंटनॅशनलच्या पिन प्रदान केल्या.
      इंडक्शन ऑफिसर व द्वितीय उपप्रांतपाल (२०२६-२७) लायन मंगेश दोशी यांनी तिन्ही क्लबमध्ये नव्याने सभासद झालेल्या सदस्यांना लायन्स इंटनॅशनलचे सेवाकार्य याची माहिती देऊन त्यांना शपथ दिली. ला.मंगेश दोशी यांनी गोवा येथे संपन्न झालेल्या संगम या प्रांतीय परिषदेत द्वितीय उप प्रांतपाल पदाच्या निवडणूकीत फलटण लायन्स परिवाराने एकजुटीने साथ व सहकार्य केल्याबद्दल सर्व पदाधिकारी व सदस्याचे आभार मानले. लायन्स इंटनॅशनलचे नुतन अध्यक्षांच्या आवाहनानुसार प्रांतातील प्रत्येक क्लबने एक शाळा दत्तक घेऊन तिथे टीटीडब्ल्यू उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.
        गेली ५८ वर्षे लायन्स क्लब फलटणचे सेवाकार्य चालू असून विविध वृत्तपत्रांचा तालुका प्रतिनिधी म्हणून आपणही याच कालावधीत सुमारे ५५ वर्षे या तालुक्यात कार्यरत असल्याने लायन्सच्या सेवा कार्याशी आपण प्रारंभी पासून परिचित आहे. श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय आणि श्रीराम कारखाना येथे लायन्स क्लब फलटणच्या माध्यमातून आयोजित मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया शिबीरात पद्मभूषण डॉ. एम. सी. मोदी यांनी हजारो रुग्णांच्या मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या. आज लायन्स आय हॉस्पिटल यांना लायन्स इंटरनॅशनल कडून विविध नेत्र शस्त्रक्रिया व तपासणी करण्यासाठी जवळपास १.२५ कोटी रुपयांच्या अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध झाल्या आहेत, सातारा जिल्ह्यातील पहिले लॅमिनार ऑपरेशन थियटर येथे उपलब्ध आहे. या आय हॉस्पिटलचा हजारो रुग्णांना फायदा झाला आहे. नुकतेच औद्योगिक क्षेत्रातील कामगार व त्यांच्या कुटुुंबियांना लायन्स मुधोजी आय हॉस्पिटलच्या माध्यमातून कॅशलेस सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचे निदर्शनास आणून देत विविध समाज घटकाच्या माध्यमातून आपला व्यवसाय सांभाळत लायन्सच्या माध्यमातून सेवा कार्यात आलेली ही सर्वच मंडळी आज सलग २-३ पिढ्या लायन्सच्या माध्यमातून सेवा कार्यात आपल्या व्यवसायाइतकीच जबाबदारी व प्रामाणिकपणा सांभाळीत कार्यरत असल्याचे अरविंद मेहता यांनी निदर्शनास आणून दिले. 
     फलटण शहरातील सर्व जनतेचे श्रद्धास्थान व आवडते ठिकाण असलेल्या माळजाई उद्यान परिसरातील देवीच्या दर्शनासाठी असंख्य महिला दररोज येत असतात. त्यामुळे येथे चांगली व्यवस्था असायला हवी या हेतून लायन्स माळजाई उद्यान समितीचे अध्यक्ष ला. प्रमोद निंबाळकर, ला. दिलीप शिंदे, ला. रणजित बर्गे, ला. महेश गरवालिया व त्यांचे सहकारी यांच्या अथक प्रयत्नातून आज माळजाई उद्यान परिसर कात टाकत आहे. सुरक्षिततेसाठी सीसीटिव्ही, वॉचमन, बसायला बेंचेस, परिसराची साफसफाई, पाण्याची व्यवस्था, उत्तम झाडांचे वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबवून माळजाई परिसर लोकांच्या कौतुकास पात्र होत असल्याचे अरविंद मेहता यांनी निदर्शनास आणून दिले. 
    नूतन अध्यक्ष ला. रणजित बर्गे, ला. ललिता ढवळे, ला. राजेंद्र कोठारी व त्यांच्या क्लबचे पदाधिकारी हे त्यांच्या कार्यकाळात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवितील व त्यांच्या उपक्रमांना समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम आम्ही पत्रकार नक्कीच करु असे आश्वासन अरविंद मेहता यांनी यावेळी दिले.
     प्रारंभी लायन्स क्लबचे मावळते अध्यक्ष ला. महेश साळुंखे, सेक्रेटरी निखिल सोडमिसे, लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या अध्यक्षा लायन सविता ढवळे, सेक्रेटरी संध्या गायकवाड यांनी त्यांच्या कार्यकाळात राबविलेले उपक्रम, सेवाकार्ये यांची माहिती दिली व या पदावर काम करण्याची संधी देऊन सर्वांनी सहकार्य केले याबद्दल आभार मानले.
      तिन्ही क्लबचे नूतन अध्यक्ष यांनी येत्या काळात सर्वांना बरोबर घेऊन व तिन्ही क्लबमध्ये समन्वय साधून जास्तीत जास्त सेवाकार्ये करण्याचा निश्चय व्यक्त केला.
      मावळते अध्यक्ष ला.महेश साळुंखे यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात कार्यक्रमाविषयी विवेचन केले. प्रा. सौ.निलम देशमुख व लायन सुहास निकम यांनी सूत्रसंचालन आणि समारोप व आभार नुतन सेक्रेटरी लायन प्रमोद निंबाळकर यांनी मानले.
0000000000000
 

No comments