Breaking News

खा.संजय पाटील यांचा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने फलटण येथे जाहीर निषेध

Kha. Sanjay Patil's public protest in Phaltan on behalf of the Marathi Press Conference

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२९ जून २०२६ - पत्रकारांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या खा. संजय पाटील यांचा  अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने फलटण येथे तीव्र शब्दांत निषेध करून संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.

    पत्रकारांच्या वतीने देण्यात आलेले निवेदन  फलटणचे तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव यांचे वतीने नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी स्वीकारले. यावेळी पत्रकार अरविंद मेहता, अजय माळवे, यशवंत खलाटे, सुभाष भांबुरे, युवराज पवार, नासिर शिकलगार, पोपट मिन्ड, विनायक शिंदे,  ॲड.रोहित अहिवळे, सुधीर अहिवळे, दादासाहेब चोरमले, शक्ती भोसले, सचिन मोरे, विशाल शहा, मितेशकाका खराडे, अभिजित सरगर, दीपक मदने, अमोल नाळे, प्रवीण काकडे, वैभव गावडे, प्रशांत रणवरे,संजय गायकवाड, वैभव जगताप, बाळासाहेब ननवरे, शेखर जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

    पत्रकार बांधवांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणारे मुजोर खासदार संजय दिना पाटील यांचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषद तीव्र शब्दांत निषेध करीत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय दिना पाटील यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, संजय दिना पाटील यांच्यासह अन्य पाच खासदारांनी शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर त्यांची नेमकी भूमिका आणि मत जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या कर्तव्यापोटी काही पत्रकार त्यांच्या घरी गेले होते. मात्र, तेथे पत्रकारांनी काही अडचणीचे प्रश्न विचारताच खासदार पाटील भडकले आणि त्यांनी थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “परत आलात तर मारून टाकीन, माझी तक्रार कोणाकडे करायची ती करा," अशी अर्वाच्च आणि अरेरावीची भाषा त्यांनी वापरली. विशेष म्हणजे, संजय दिना पाटील यांना 'वाय' (Y) दर्जाची सुरक्षा व्यवस्था असून, पोलिसांसमोरच त्यांनी ही धमकी दिल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. त्यामुळे त्यांची ही सुरक्षा व्यवस्था त्वरित काढून घेण्यात यावी. एका खासदाराला न शोभणारी ही भाषा अत्यंत संतापजनक व निषेधार्ह आहे . यापूर्वीही शिवसेनेला उद्देशून संजय दिना पाटील यांनी, “माझ्याकडे बॉम्ब आहे, माझ्याकडे निदर्शने करायला कोणी आले तर बॉम्ब टाकेन, तसेच मी पाच खून केलेले आहेत,” अशी मुक्ताफळे उधळली होती. एक खासदार स्वतःकडे बॉम्ब असल्याची उघड धमकी देत असेल, तर ती अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यांच्याकडे खरोखरच बॉम्ब आहे का आणि असल्यास तो कुठून आला, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही पत्रकार परिषदेकडून करण्यात येत आहे.

No comments