Breaking News

शाळेने केलेला सत्कार दीर्घकाल स्मरणात राहील - मोहनराव डांगे

The felicitation done by the school will be remembered for a long time - Mohanrao Dange

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२९ - जीवनात ध्येय गाठायचे असेल तर कठोर परिश्रमास पर्याय नाही. यासाठी आपल्या अंगी जिद्द, चिकाटी असली पाहिजे, सातत्याने प्रयत्न केले तर आपणाला यशापासून कोणीही रोखू शकत नाही. चांगल्या कामाचे कौतुक केले पाहिजे  त्यामुळे प्रेरणा मिळते ध्येय गाठाण्याची जिद्द आपोआपच प्राप्त होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जिंती गावामध्ये असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमध्ये शिकायला मिळते हे आपले परम भाग्य आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये माणसे जोडायचे काम केले जाते आणि यातूनच एक चांगल्या समाजमनाची निर्मिती होते. चांगल्या बाबींचे कौतुक केले तर जगण्यास अधिक बळ मिळते. शाळेने केलेला सत्कार दीर्घकाल स्मरणात राहील असे  जिंती ता. फलटण येथे ग्रामपंचायत हॉलमध्ये  रयत शिक्षण संस्थेचे, श्री जितोबा विद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या गुणवंतांचा विशेष सत्कार समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते मोहनराव डांगे यांनी मत व्यक्त केले.

    यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी राजेंद्र रणवरे, प्रमुख पाहुणे महादेवराव गुंजवटे, प्रकाश रणवरे, महादेव रणवरे, नवनाथ रणवरे, जगदेवराव रणवरे, सौ माधुरी जाधव, ताराचंद्र आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    मोहनराव डांगे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शालेय वयामध्ये अभ्यास करून आपल्या जीवनात आकार घेतला पाहिजे व समाजासाठी भविष्यात दिशादर्शक ठरले पाहिजे घडणे हे आपल्या हातात आहे त्यासाठी सकारात्मक विचार करणे काळाची गरज आहे. यावर्षी दहावीत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास ट्रॉफी भेट देण्याचे त्यांनी जाहीर केले.

    महादेवराव गुंजवटे म्हणाले की, शेतकरी शेतमजुरांची मुले घडविण्याचे काम या विद्यालयांमध्ये घडत असून त्यासाठी इथला अध्यापक सतत कार्यप्रवण असतो. जीवनात योग्य क्षेत्राची निवड करा व घडा. सात्विक विचार केला तर माणसाचे मन घडते. सर्वांगीण विकास होण्यास मदत होते.

    आळस झटका, सकारात्मक विचार करा, आरोग्य जपा, सूर्यनमस्कार करा. ध्यानधारणा, प्राणायाम, योगासने हे आपल्या जीवनामध्ये चैतन्य निर्माण करतात, प्रचंड इच्छाशक्तीने काहीही मिळवता येते. चुका आणि शिका हा नियम पाळा. भूतकाळाचा कमी विचार करा व वर्तमान प जगण्याचा प्रयत्न करा. स्वामी विवेकानंद प्रमाणे आपले विचार आदर्शवत ठेवण्याचा प्रयत्न करा व वाचन संस्कृती वाढविण्यासाठी आपण दररोज किमान एक पुस्तकाचे पान  वाचले पाहिजे. शब्द जपून वापरा त्यामुळे कोणाच्या मनाला इजा होणार नाही याची दक्षता घ्या.

    यावेळी स्कूल कमिटी सदस्य प्रकाश रणवरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ज्येष्ठ शिक्षक, समुपदेशक ताराचंद्र आवळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अर्चना सोनवलकर यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका सौ.माधुरी जाधव यांनी मानले. सुरुवातीला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी विद्यालयाचे नवनियुक्त स्कूल कमिटी सदस्य राजेंद्र रणवरे, प्रकाश रणवरे, महादेव रणवरे व इयत्ता दहावी प्रथम तीन क्रमांक विद्यार्थी ओम रणवरे याला महादेवराव गुंजवटे यांच्यातर्फे  ट्रॉफी भेटवस्तू व गुलापुष्प, अर्णव रणवरे, कु. नम्रता वाघमारे यांना भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे इयत्ता सहावी ते आठवी इतिहास विषय लेखन समिती सदस्य, समुपदेशक  ताराचंद्र आवळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

    यावेळी सौ विद्या जमदाडे,शाहीन हन्नूरे, अंकुश सोळंकी, जीवन देशमुख, अमोल जाधव, मधुकर जगताप, राजेंद्र घाडगे तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

No comments