फलटण येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी, साखरवाडीत अतिरिक्त तहसीलदार कार्यालयास मंजुरी
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१२ : राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत फलटण येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय तसेच साखरवाडी येथे अतिरिक्त तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. ही माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी दिली.
फलटणसोबतच माढा लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर येथेही अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयास मंजुरी देण्यात आली असून, त्यामुळे या भागातील प्रशासकीय कामकाजाला मोठा वेग मिळणार आहे.
या निर्णयाबाबत निंबाळकर व आमदार पाटील म्हणाले, “फलटणला स्वतंत्र जिल्हा करणे हे आमचे स्वप्न आहे. मंजूर झालेले अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय हे त्या दिशेने टाकलेले पहिले व अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. जिल्हास्तरीय सर्व महत्त्वाची कार्यालये टप्प्याटप्प्याने फलटण येथे आणण्याचा आमचा मानस आहे. आगामी काळात ‘टाऊन प्लॅनिंग ऑफिस’ सुद्धा फलटण येथे आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने हे लक्ष्य लवकरच साध्य होईल.”
फलटण, साखरवाडी आणि पंढरपूरच्या विकासाला गती देणाऱ्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांचे रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी विशेष आभार मानले आहेत.
निंबाळकर व आमदार पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, या निर्णयामुळे आता नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामांसाठी साताऱ्याला जाण्याची गरज भासणार नाही. ही सर्व कामे आता फलटणमध्येच सुलभपणे पार पडणार असल्याने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

No comments