आयडियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 'फादर्स डे' निमित्त 'आयडियल फादर्स प्रीमियर लीग'; १०० वडिलांचा उत्स्फूर्त सहभाग
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबत पालकांचा शाळेशी सहभाग अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने फलटण येथील आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये 'फादर्स डे'निमित्त 'आयडियल फादर्स प्रीमियर लीग (IFPL) २०२६' या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बिरदेवनगर येथील शाळेच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेला तब्बल १०० वडिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी झाले होते. दिवसभर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यांमुळे मैदानावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सामन्यांपूर्वी संस्थापिका डॉ. वैशाली शिंदे, डायरेक्टर शिवराज भोईटे, सुमित शहा व क्रीडा शिक्षिका शुभदा झणझणे यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेच्या शिक्षकांचाही विशेष मैत्रीपूर्ण सामना आयोजित करण्यात आला.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सहभागी वडील आणि त्यांच्या पाल्याचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या क्रीडा शिक्षिका शुभदा झणझणे यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
अंतिम सामन्यात 'थंडर एक्स' संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर विजेतेपद पटकावले, तर 'टायटन नोव्हा' संघ उपविजेता ठरला. 'थंडर एक्स'चे संग्राम गायकवाड यांना 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरविण्यात आले. विजेता, उपविजेता संघ आणि मानकरी खेळाडूंना संस्थापिका डॉ. वैशाली शिंदे यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेंटर हेड सुचिता जाधव यांनी केले, तर प्रशांत लोंढे यांनी प्रभावी समालोचन करून स्पर्धेत रंगत आणली.
या उपक्रमामागील संकल्पना संस्थापिका डॉ. वैशाली शिंदे यांची असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सेक्रेटरी निखिल कुदळे, क्रीडा शिक्षिका शुभदा झणझणे व प्रवीण पवार यांनी स्पर्धेचे नियोजन केले.
या उपक्रमामुळे वडिलांना कुटुंबासोबत आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी मिळाली, मुलांच्या मनात वडिलांविषयीचा आदर अधिक दृढ झाला आणि शाळा-पालक यांच्यातील नाते अधिक बळकट झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

No comments