Breaking News

फलटणच्या अंतर्गत रस्त्यांसाठी ७० कोटींचा निधी; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून मंजुरी

Fund of Rs 70 crore for internal roads of Phaltan; Approval from Union Minister Nitin Gadkari

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  : फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारने ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या निधीला मंजुरी दिल्याची माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

    नवी दिल्ली येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था निदर्शनास आणून देत निधीची मागणी करण्यात आली. त्यानंतर गडकरी यांनी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करत संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्तावित कामे तातडीने मंजूर करून सहा महिन्यांच्या आत काम सुरू करण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले.

    यापूर्वीही फलटण शहरातून जाणाऱ्या पालखी महामार्गासाठी सुमारे ७५ कोटी रुपये तसेच शहरातील 'मिसिंग लिंक' मार्गासाठी ९७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आता नव्याने मंजूर झालेल्या ७० कोटी रुपयांच्या निधीमुळे शहरातील प्रमुख अंतर्गत रस्ते उच्च दर्जाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांमध्ये रूपांतरित होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

    याबाबत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. फलटण शहर व तालुक्याच्या विकासासाठी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध होत असून भविष्यातही विकासकामांसाठी अशाच प्रकारे निधी मिळत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

No comments