Breaking News

ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : १७ व १८ जुलैसाठी फलटण शहरात विशेष वाहतूक व्यवस्था; पर्यायी मार्ग जाहीर

Dnyaneshwar Maharaj Palkhi Ceremony: Special traffic arrangements in Phaltan city for July 17th and 18th; Alternative routes announced

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त दि. १७ व १८ जुलै २०२६ रोजी फलटण शहर व परिसरात विशेष वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली असून, पालखीसोबतच्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. नागरिक, वारकरी व वाहनचालकांनी पोलीस प्रशासनाने निश्चित केलेल्या मार्गाचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन फलटण शहर पोलीस ठाण्याने केले आहे.

    दि. १७ जुलै रोजी पालखीचा मुक्काम फलटण विमानतळ येथे असल्याने पालखीसोबतची वाहने तांबमाळ येथील निरा उजवा कालवा नवीन पालखी मार्गावरील उड्डाणपुलाचा वापर करून तांबमाळ – चौधरवाडी उड्डाणपूल – सस्तेवाडी उड्डाणपूल – कांबळेश्वर उड्डाणपूल – धुळदेव उड्डाणपुलाखालून यू-टर्न – बारामती रोड उड्डाणपूल – सोमवार पेठ – नाना पाटील चौक – दहिवडी चौक – डी.एड. चौक – गिरवी नाका – फलटण पालखी मुक्काम या मार्गाने जातील.

    या संपूर्ण मार्गावर पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग व वाहतूक वळविण्याचे (डायव्हर्शन) पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत.

    दि. १८ जुलै रोजी पालखी बरड मुक्कामाकडे प्रस्थान करताना पालखीसोबतची वाहने दहिवडी चौक – कोळकी तिकटणे – सोनवडी – वडले (फौजीनगर) – माझेरी – विडणी पालखी विसावा या पर्यायी मार्गाचा वापर करतील.

    पिंप्रद येथील दुपारच्या जेवणाच्या विसाव्यासाठी जाणाऱ्या वाहनांनी वडले गावातून डावीकडे वळून पिंप्रद पालखी विसावा स्थळी जावे. तसेच बरड मुक्कामासाठी जाणाऱ्या वाहनांनी पिंप्रदमार्गे मिरडे फाटा येथून डावीकडे वळून बरडकडे जावे, असेही पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    फलटण शहर पोलीस ठाण्याने नागरिक, वारकरी, वाहनचालक तसेच पालखीसोबतच्या सर्व वाहनचालकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

No comments