श्रीराम कारखाना सुरू होऊ नये म्हणून विरोधकांचे प्रयत्न; 200 रुपये मिळाल्याची वल्गना पूर्ण खोटी - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२५ - श्रीराम सहकारी साखर कारखाना सुरू होऊ नये आणि तो बंद राहिल्यास त्याचा राजकीय व आर्थिक फायदा काहींना मिळेल, या हेतूने विरोधकांकडून सातत्याने दिशाभूल करत आहेत. सहयोगी तत्त्वावर कारखाना चालवायला देताना तो सहकारी कारखान्याला द्यायचा की खासगी कारखान्याला, असा कुठलाही भेदभाव मूळ शासन निर्णयात नाही. शासन निर्णयातील सर्व आवश्यक अटी 'दत्त इंडिया' कंपनी पूर्ण करत असून, साखर आयुक्तांनीही या निर्णयाला समर्थन दिले आहे. त्यामुळे विरोधकांनी घेतलेली पत्रकार परिषद केवळ दिशाभूल असल्याचे सांगतानाच श्रीराम कारखान्याबाबत 200 रुपये मिळाल्याची वल्गना पूर्ण खोटी असून 'यांच्या' बुद्धीची कीव करावीशी वाटतेय असा टोला श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांना लगावला.
पत्रकार परिषदेस श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे, व्हा चेअरमन नितीन शाहूराजे भोसले, संचालक संतोष खटके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले की, सध्याच्या काळात साखर उद्योग मोठ्या आर्थिक अडचणीतून जात आहे. यापूर्वी कारखाना चालवणाऱ्या जवाहर उद्योग समूहाने तो चालविणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे कारखाना बंद पडू नये, शेतकरी आणि कामगारांचे नुकसान होऊ नये यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम संस्थेकडे कारखान्याचे संचालन देण्याचा पर्याय पुढे आला होता. त्याअनुषंगाने शरयू अॅग्रो आणि श्री दत्त इंडिया या दोन कंपन्यांनी कारखाना चालविण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामध्ये श्री दत्त इंडियाने सर्वाधिक वार्षिक भाड्याचा प्रस्ताव दिल्याने सर्वसाधारण सभेने सर्वानुमते त्यांना कारखाना देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कारखान्याच्या व्यवहारात आर्थिक गैरव्यवहार किंवा देवाणघेवाण झाल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहेत. मात्र, जवाहर उद्योग समूहाचे कलाप्पा अण्णा आवाडे अजूनही कारखान्यात येऊन कारभाराची माहिती घेत असतात. त्यांनीच यासंदर्भात वस्तुस्थिती सांगावी, असे आवाहनही त्यांनी केले. सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत कारखाना चालविणे हेच मोठे आव्हान असून अशा परिस्थितीत भ्रष्टाचाराचे आरोप करणे म्हणजे केवळ राजकारण असल्याचे ते म्हणाले.
साखरवाडी येथील श्री दत्त इंडिया साखर कारखाना हा तालुक्यातील सर्वाधिक सक्षम आणि प्रगत कारखान्यांपैकी एक असून त्यांच्याकडे डिस्टिलरी, को-जनरेशनसह विविध पूरक प्रकल्प आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर आणि वेळेवर सुविधा देण्याची क्षमता त्या कंपनीमध्ये असल्याने त्यांना संचालन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनाही आव्हान देत, "साखरवाडी कारखाना त्यांनी किती किंमतीत विकत घेतला होता, हे त्यांनी जाहीर करावे," असे म्हटले.
राज्य शासनाच्या जीआरनुसार कारखाना सहकारी संस्थेने चालवावा की खाजगी संस्थेकडे द्यावा, असा कोणताही मुद्दा नसून संबंधित संस्था कारखाना कार्यक्षमतेने चालवू शकते का, एवढाच विषय शासनासमोर असतो. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करूनच प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र मात्र, कारखाना बंद राहिल्यास त्याचा फटका थेट शेतकरी आणि कामगारांना बसणार असल्याने त्यांचे हित लक्षात घेऊनच सर्व निर्णय घेण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी अध्यक्ष बाळासाहेब शेंडे यांनी माहिती देताना सांगितले की, जवाहर उद्योग समूहाने कारखाना चालविण्यास असमर्थता दर्शविणारे पत्र दिल्यानंतर श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर आणि संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेकडे कारखाना चालवण्यासाठी आर्थिक मदतीची कर्जरूपी मागणी करण्यात आली होती मात्र त्यांनी आमचे नेटवर्थ चांगले नसल्याने त्यांनी कर्ज देण्यास नकार दिला त्यानंतर शरयू अॅग्रो आणि श्री दत्त इंडिया या दोन कंपन्यांनी रस दाखविला. त्यापैकी श्री दत्त इंडियाचा प्रस्ताव आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक फायदेशीर असल्याने त्यांच्याकडे कारखान्याचे संचालन देण्याबाबत सर्वांचे एकमत झाले असल्याचे सांगितले.
.jpg)
No comments