फलटणमध्ये गुटखा-पान मसाल्यावर धडक कारवाई; ४१ हजारांचा साठा जप्त, एकाला अटक
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१८ जून २०२६ : प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासन विभाग आणि फलटण शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नरसोबानगर, कोळकी येथे छापा टाकला. या कारवाईत ४१ हजार १८० रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ जून २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नरसोबानगर, कोळकी येथील किरण शशिकांत दोषी यांच्या घरात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार सातारा अन्न व औषध प्रशासन विभागाने फलटण शहर पोलिसांच्या मदतीने छापा टाकून कारवाई केली.
या कारवाईत किरण शशिकांत दोषी यांच्या ताब्यातून ४१ हजार १८० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी किरण शशिकांत दोषी (रा. नरसोबानगर, कोळकी, ता. फलटण) यांच्यासह विमल पान मसाला, वी-१ टोबॅको किंग पॅक, एम. स्केंटेड टोबॅको गोल्ड, आर.एम.डी. पान मसाला, रजनीगंधा फ्लेवर्ड पान मसाला आणि तुलसी रॉयल जाफरानी जर्दा या सहा कंपन्यांचे उत्पादक, मालक, भागीदार व संचालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रूपाली आप्पासाहेब खापणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील विविध कलमे तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम ३(५), १२३, २२३, २७४ आणि २७५ अन्वये १८ जून २०२६ रोजी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणात किरण शशिकांत दोषी यांना अटक करण्यात आली असून प्रतिबंधित गुटखा व पान मसाला उत्पादित करणाऱ्या संबंधित सहा कंपन्यांच्या मालक, भागीदार व संचालकांवरही कठोर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे, फलटण शहर पोलीस ठाणे करीत आहेत.

No comments