Breaking News

साखरवाडीत स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालयाचा प्रस्ताव; ७ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागविल्या

Proposal for separate Additional Tehsildar office in Sakharwadi; Objections and suggestions sought by July 7

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ : फलटण उपविभागातील महसूल प्रशासन अधिक सक्षम, गतिमान व नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने साखरवाडी (पिंपळवाडी) येथे स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, त्याबाबतचा प्रारूप सूचनेचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

    महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील तरतुदींनुसार उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी प्रियांका आंबेकर यांनी हा मसुदा प्रसिद्ध केला आहे. प्रस्तावानुसार साखरवाडी (पिंपळवाडी) येथे मुख्यालय असलेले स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय कार्यरत करण्यात येणार असून त्याच्या कार्यक्षेत्रात होळ, तरडगाव आणि आदर्की बुद्रुक या महसूल मंडळांचा समावेश करण्यात येणार आहे.

    सध्या फलटण तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील फलटण, कोळकी, बरड, आसू, राजाळे, गिरवी आणि वाठार निंबाळकर ही महसूल मंडळे पूर्ववत फलटण तहसील कार्यालयाच्या अखत्यारीत राहणार आहेत.

    या पुनर्रचनेमुळे महसूल विषयक सेवा नागरिकांना अधिक जवळून उपलब्ध होणार असून विविध प्रशासकीय कामकाजात गती येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शेतकरी, नागरिक आणि संबंधितांना महसूल कार्यालयाशी निगडित कामांसाठी होणारी धावपळ कमी होण्यास मदत होणार आहे.

    या प्रस्तावासंदर्भात नागरिक, शेतकरी तसेच संबंधित व्यक्तींना हरकती किंवा सूचना सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. इच्छुकांनी आपल्या लेखी हरकती व सूचना ७ जुलै २०२६ पर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालय, फलटण येथे सादर कराव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून शासनाकडून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

No comments