Breaking News

फलटणमध्ये 4 किलो 69 ग्रॅम गांजासह दोघांना अटक; 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

Two arrested with 4 kg 69 grams of ganja in Phaltan; Goods worth Rs 2 lakh seized

    फलटण, दि. 30 : स्थानिक गुन्हे शाखा सातारा आणि फलटण शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत 4 किलो 69 ग्रॅम गांजा, एक मोटारसायकल व दोन मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 1 हजार 725 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

    पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदेशीर गांजा विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले होते.

    दिनांक 29 मे रोजी फलटण येथे कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदी सुरू असताना पो.उ.नि. परितोष दातीर यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन इसम बजाज प्लॅटिना (क्र. MH-12-HX-2649) मोटारसायकलवरून मौजे धुळदेव, ता. फलटण हद्दीतील राव रामोशी पुलाजवळ गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहेत.

    माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि फलटण शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने सापळा रचून छापा टाकला. कारवाईदरम्यान दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातील पिशवीची झडती घेतली असता 4 किलो 69 ग्रॅम वजनाचा गांजासदृश अंमली पदार्थ आढळून आला. हा मुद्देमाल पुढील तपासासाठी जप्त करण्यात आला आहे.

    या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे, नितीन शिंदे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व फलटण शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

No comments