Breaking News

प्रा. अशोक शिंदे लिखित “गाव पांढरीच्या वैभवखूणा” या ललित ग्रंथास राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार जाहीर

State-level first award announced for the fine book “Gaon Pandharicha Vaibhavkhuna” written by Prof. Ashok Shinde

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३० मे २०२६ -  नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव जलाल, येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती ५ व्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्काराचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, या पुरस्कारांतर्गत ललितलेख संग्रहासाठी प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार मुधोजी महाविद्यालय, फलटण  जि. सातारा येथील मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. अशोक शिंदे यांच्या ‘गाव पांढरीच्या वैभवखुणा’ या साहित्यकृतीसाठी जाहीर झाला असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

    शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित २०२५ या वर्षासाठीच्या ५ व्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्काराचे नियोजन करण्यात आले होते. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून निवडक साहित्य प्रकारांच्या साहित्यकृती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार १०३ कविता संग्रह, ४१ कथा संग्रह, २२  कादंबऱ्या आणि २० ललित लेखसंग्रह अशा एकूण - १८६ साहित्य कलाकृती या पुरस्कारासाठी प्राप्त झाल्या होत्या. या कलाकृतीतून प्रत्येक साहित्य प्रकारातील कलाकृतीला खालीलप्रमाणे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

    या पुरस्कारांतर्गत ललितलेख संग्रह या साहित्य प्रकारासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार फलटण जि. सातारा येथील लेखक प्रा. अशोक शिंदे यांच्या ‘गाव पांढरीच्या वैभवखुणा’ तर उत्तेजनार्थ अमरावती येथील अरुणा सबाने यांच्या ‘उमेद जगण्याची’ या साहित्यकृतीसाठी जाहीर झाला आहे.

    याशिवाय कविता संग्रहासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नांदगाव जि. नाशिक येथील कवयित्री प्रतिभा सुरेश खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’, तर उत्तेजनार्थ पुरस्कार धुळ्याचे कवी अरविंदा भामरे यांच्या ‘शापित कोलाहलाच्या नोंदी’ तसेच कथा संग्रहासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार राहुरी, जि. अहिल्यानगर येथील लेखक सयाजी शिंदे यांच्या ‘चरैवेति’, तर उत्तेजनार्थ सोलापूर येथील लेखिका संध्या धर्माधिकारी यांच्या ‘बेरं’ या कलाकृतीसाठी आणि कादंबरीसाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कडेगाव जि. सांगली येथील लेखक राजेश चौरे यांच्या ‘जिद्द पेरतांना’ तर उत्तेजनार्थ पारनेर जि. अहिल्यानगर येथील अशोक पवार यांच्या ‘…आणि रामा कलेक्टर झाला’ या कलाकृतीसाठी जाहीर करण्यात आला आहे.

    वरील पुरस्कारांतर्गत ललितलेख संग्रहासाठी प्रा. राम गायकवाड, कोपरगाव हे परीक्षक म्हणून लाभले होते. तर कविता संग्रहासाठी प्रा. अमोल चिने, कोपरगाव, कथा संग्रहासाठी डॉ. प्रकाश कारभारी शेवाळे, कादंबरीसाठी प्रा. डॉ. आर. जे. इंगोले, चांदवड या मान्यवर परीक्षकांनी परीक्षणाचे काम केले आहे. या परीक्षकांनी दिलेल्या निर्णयाचे स्वागत करुन प्रतिष्ठानने लेखक प्रा. अशोक शिंदे यांच्यासह सर्व पुरस्कारार्थीचे अभिनंदन केले आहे. पुरस्कार प्राप्त सर्व कलाकृतींचा सन्मान दि. ४ जून २०२६ रोजी पिंपळगाव जलाल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार प्रदान सोहळ्यात होणार असल्याचेही प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ यांनी सबंधित पत्रात कळविलेले आहे.

    प्रा. डॉ. शिंदे यांच्या या ग्रंथास यापूर्वी शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचा ‘शिविम साहित्य पुरस्कार’ व अँग्रो न्यूज परिवार ट्रस्ट यांचा ‘छत्रपती संभाजी महाराज साहित्य सेवा पुरस्कार’ हे राज्यस्तरीय दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘गाव पांढरीच्या वैभवखुणा’ ललित लेखांचा संग्रह लोकजीवानातील साधनांचे विलोभनीय दर्शन घडवणारा ग्रंथ आहे. लेखक अशोक शिंदे यांच्या या ग्रंथास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ मराठी साहित्यिक तथा समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना तर मराठी साहित्यिक व प्रसिद्ध व्याख्याते डॉ. यशवंत पाटणे यांची पाठराखण लाभली आहे. या ग्रंथात ग्रामीण व कृषिजीवनातील नामशेष होत चाललेल्या साधनांचे महत्त्व, उपयोगिता आणि त्यांचे सांस्कृतिक व सामाजिक स्थान ललित रम्य भाषेतून लेखक शिंदे यांनी मांडले आहे. एकूण अठरा ललित लेख असलेल्या या ग्रंथात भारतीय कृषी व ग्रामीण संस्कृतीतील प्रमुख साधनांचे प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळापर्यंतचे लोकवैभव शब्दबद्ध केलेले आहे. या ग्रंथातील लेखात समाविष्ठ गाव शिवारातील नांगर, मोट, पोहरा, कावड, जाते, करंडा, काठवट, माळा, वावडी, कणगी, गंज, चोपणी, सूप, कंदील, अडकित्ता, बाज, गोधडी आणि आगळ ही परंपरागत साधने लोकसंस्कृतीची महती सांगतात. ही साधने आज काळाच्या ओघात विस्मृतीत जात आहेत. ही साधने म्हणजे केवळ वापरायच्या वस्तू नसून ही साधने म्हणजे आपल्या संस्कृतीचा अमूल्य व जिवंत वारसा आहेत. बदलत्या काळात व आधुनिक माहिती तंत्रज्ञान तथा डिजिटल क्रांतीच्या युगात वापरात नसलेल्या व विस्मृतीत जाऊ पाहणाऱ्या या साधनांचे रूप, वापर, महत्व व उपयोगीता या ग्रंथाच्या रूपाने लेखकाने साकारली आहे. ग्रामीण व कृषी संस्कृतीचे सजीव दर्शन घडविणाऱ्या या ग्रंथात लोकजीवनाच्या समृद्ध वारशाच्या वैभवखुणा चित्रित झाल्या आहेत. त्यामुळे हा ग्रंथ सद्या वाचक, समीक्षक व परीक्षक यांच्या पसंतीला उतरत आहे.

    या पुरस्काराबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी गव्हर्निग कौन्सिल चेअरमन, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रा. डॉ. शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. तसेच मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम व  सर्व सहकारी शिक्षक याशिवाय अनेक मान्यवरांनी लेखक प्रा. डॉ. अशोक शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

No comments