न वटणारा चेक देऊन फसवणूक ; आरोपीस ५ महिने सश्रम कारावास व ५ लाखांचा दंड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२९ मे २०२६ -: हात उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी खात्यात रक्कम नसताना न वटणारा चेक देऊन, फसवणूक केल्याप्रकरणी सरडे ता. फलटण येथील सुरेश माणिक मोरे यास फलटण न्यायालयाने ५ महिने सश्रम कारावास व ५ लाख रुपये नुकसान भरपाईची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी श्रीमती जे. एस. खेडकर-गोयल यांनी सुनावली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सरडे ता. फलटण येथील दत्तात्रय सखाराम भोसले यांनी ओळखीतील सुरेश माणिक मोरे यास सुमारे सव्वादोन लाख रुपये हात उसने दिले होते. ठरलेल्या मुदतीत पैसे परत न केल्याने मोरे यांनी आपल्या खात्यात पुरेशी रक्कम नसतानाही भोसले यांना धनादेश दिला. मात्र संबंधित धनादेश बँकेत सादर केल्यानंतर खात्यात शिल्लक रक्कम नसल्याने तो न वटता परत आला.
यानंतर दत्तात्रय भोसले यांनी न्यायालयात चेक बाऊन्सची केस दाखल केली होती. या प्रकरणात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गुणवरे शाखेच्या शाखाधिकारी सौ. योगिता साळुंखे यांच्यासह अन्य साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. तसेच संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचे निष्पन्न केले.
न्यायालयाने परक्राम्य लिखत अधिनियम १८८१ च्या कलम १३८ अन्वये आरोपी सुरेश मोरे यास दोषी ठरवत फिर्यादी दत्तात्रय भोसले यांना ५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. तसेच ५ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. निर्धारित मुदतीत दंडाची रक्कम न भरल्यास आणखी १ महिन्याचा सश्रम कारावास भोगावा लागणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात फिर्यादीच्या वतीने अॅड. निलेश भोसले यांनी सहकार्य केले असून अॅड. उमेश कदम यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद करून आरोपीस शिक्षा मिळवून दिली.

No comments