जिल्हा परिषदेचा बदला चुकता! राष्ट्रवादी-शिवसेनेची एकजूट; भाजपला सत्तेपासून दूर ठेवत उदयसिंह उंडाळकर अध्यक्षपदी, तर दीपकराव चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड
Udaysinh Undalkar elected as the chairman of the district bank, while Deepakrao Chavan was elected as the vice-chairman.
फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तास्थापनेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकजूट दाखवत भाजपला अध्यक्षपदापासून दूर ठेवले. भाजपचे संचालक संख्याबळ अधिक असतानाही दोन्ही पक्षांनी एकत्र येत सत्तेची समीकरणे बदलली. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकीय घडामोडींचा बदला जिल्हा बँकेच्या सत्तेतून चुकता करण्यात आल्याची चर्चा फलटणसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात रंगू लागली आहे. बँकेच्या अध्यक्षपदी उदयसिंह उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी माजी आमदार दीपकराव चव्हाण यांची निवड झाली.
जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक संचालक निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ, तर शिवसेनेचे चार संचालक निवडून आले होते. संख्याबळाच्या दृष्टीने भाजपचे पारडे जड असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व भाजपला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यात यश मिळाले.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचा, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचा प्रतिनिधी, असे राजकीय समीकरण निश्चित झाल्यानंतर उपाध्यक्षपदासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी माजी आमदार दीपकराव चव्हाण यांच्या नावाला पसंती दिली.
जिल्हा बँकेच्या सत्तास्थापनेत राष्ट्रवादी-शिवसेनेने साधलेली राजकीय खेळी आणि भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यात मिळवलेले यश यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात या निवडीची विशेष चर्चा होत आहे.

No comments