फलटण एमआयडीसी विस्तार लवकरच; भविष्यात शिवसेनेचाच आमदार निवडून येणार - उदय सामंत
फलटण गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ मे २०२६ : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदेत शिवसेनेला मोठे यश मिळाले असून, भविष्यात फलटणचा आमदार शिवसेनेचाच होईल असा विश्वास व्यक्त करून, फलटण येथील औद्योगिक वसाहतीचा (MIDC) विस्तार लवकरच करण्याची घोषणा करताना, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनींचे अधिग्रहण कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांशी चर्चा करूनच केले जाईल, व एमआयडीसीचा विस्तार केला जाईल,अशी महत्त्वपूर्ण ग्वाही राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेघ असून, फलटणकरांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी औद्योगिक वसाहत विस्तार आणि बेरोजगारांना रोजगार देण्याची मागणी सरकार शंभर टक्के पूर्ण करेल," असेही त्यांनी प्रतिपादन केले.
फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी निवड, बीएलए २ नोंदणी अभियान आणि सातारा जिल्हा परिषद, फलटण पंचायत समिती, फलटण नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना सदस्यांचा सत्कार करण्यासाठी संयुक्त शिवसेना महिला आघाडी, युवासेना आणि शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना ना. उदय सामंत यांनी हे विचार व्यक्त केले.
याप्रसंगी व्यासपीठावर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, खा. डॉ. ज्योती वाघमारे, माजी खा. राहुल शेवाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, शिवसेना माढा लोकसभा संपर्कप्रमुख डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रराव पाटील, युवा सेना संपर्कप्रमुख सुजित खुडे, नगरसेवक अँड.श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, फलटण-कोरेगाव विधानसभा बीएलए १ प्रमुख विराज खराडे, शिवसेना फलटण तालुकाप्रमुख नानासाहेब तथा पिंटू इवरे, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, माजी सभापती शंकरराव माडकर, सौ. रेश्मा भोसले, सह्याद्री कदम, सौ. वैशाली कांबळे, गिरीश बनकर, उपसभापती अमोल सस्ते, माण तालुका संपर्कप्रमुख बाळासाहेब मुलाणी यांच्यासह फलटण, कोरेगाव, माण, खटाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. उदय सामंत यांनी पुढे सांगितले की, "पोटॅशियम उत्पादन व पुरवठा क्षेत्रात जागतिक स्तरावरील तृतीय क्रमांकाचा कारखाना फलटण तालुक्यात कार्यरत आहे, ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. मी स्वतः या कारखान्याच्या निर्यातक्षम उत्पादन आणि रोजगार निर्मितीची माहिती प्रत्यक्ष जाऊन घेतली आहे. त्यांच्या मागणीनुसार या कारखान्याला औद्योगिक वसाहतीमध्ये आगामी दिवसात आवश्यक जागा देण्याची घोषणा मी करत आहे." पश्चिम महाराष्ट्र साखर उत्पादनात नेहमीच आघाडीवर राहिला आहे, परंतु पोटॅशियम उत्पादनात जगात तिसरा क्रमांक असलेला कारखाना फलटणमध्ये असणे ही या भागासाठी गौरवास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिवसेना पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी शाखाप्रमुख आणि बीएलए २ (BLA 2) ही रचना अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. एका लोकसभा मतदारसंघात या माध्यमातून सुमारे १६ हजार ५०० पदाधिकारी निर्माण होतील. फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात या कामात आघाडी घेतली असून येथे १०० टक्के बीएलए २ नियुक्ती पूर्ण झाली आहे. आगामी काळात शाखाप्रमुखांच्या नियुक्त्या करून येथील पक्ष संघटना अधिक मजबूत केली जाईल. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदेत शिवसेनेला मोठे यश मिळाले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
तळागाळातील कार्यकर्त्यांची काळजी घेणारे नेतृत्व: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसैनिकांना व त्यांच्या कुटुंबांना पूर्ण संरक्षण दिले जाईल. एकनाथ शिंदे हे देशातील एकमेव असे नेतृत्व आहेत जे दिवसातून १८ ते २० तास जनतेसाठी काम करतात. तुम्ही पक्षासाठी केवळ २ तास वेळ द्या, आगामी काळात शिवसेना हा महाराष्ट्रातील नंबर एकचा पक्ष असेल, असा विश्वास ना. सामंत यांनी व्यक्त केला. तसेच शिवसेनेत गटबाजी व मतभेदाला थारा न देता, उत्तम काम करणाऱ्या शिवसैनिकाला प्राधान्य देऊन त्याला पाठबळ देण्याची भूमिका पक्षाची आहे.
या बैठकीप्रमाणेच महाराष्ट्रातील १३६ मतदारसंघांचा दौरा करून पक्षाचा विस्तार, पदाधिकारी निवड, शासकीय समित्या व जिल्हा नियोजन व विकास मंडळावरील निवडींबाबत सविस्तर अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी ना. उदय सामंत व इतर मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी आजच्या मेळाव्याविषयी सविस्तर माहिती देऊन, शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अल्पावधीत दिलेल्या पाठबळामुळे पक्ष संघटना मजबूत झाल्याचे सांगितले आणि आगामी काळातही अशाच पद्धतीचे पाठबळ मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या मेळाव्यात नवनिर्वाचित उपसभापती अमोल सस्ते यांच्यासह जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपरिषद नवनिर्वाचित सदस्यांचा ना. उदय सामंत व मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पै. चंद्रराव पाटील, विराज खराडे, सौ. रेश्मा भोसले, बाळासाहेब मुलाणी यांची देखील भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रमोद रणवरे यांनी केले.

No comments