Breaking News

एकही पात्र नागरिक मतदार यादीबाहेर राहणार नाही याची दक्षता घ्या- राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम* *जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) बैठक संपन्न*

Ensure that no eligible citizen is left out of the voter list - State Chief Electoral Officer S. Chokkalingam; Special Summary Review (SIR) meeting held at the District Collector's Office

    सातारा दि. २७- नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदणी करताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रत्येक पात्र मतदाराची नोंदणी सुनिश्चित करण्याचे निर्देश देवून एकही पात्र नागरिक मतदार यादीबाहेर राहणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिल्या.

    जिल्हाधिकारी कार्यालयात SIR विषयी बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवडणूक अधिकारी भगवान कांबळे सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार आणि दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व  मुख्याधिकारी उपस्थित होते.

    एस चोक्कलिंगम म्हणाले, शंका असलेल्या ठिकाणी सखोल चौकशी करण्यात यावी तसेच २० जूनपर्यंत हेल्प डेस्क सुरू करून विशेष शिबिरे आयोजित करावीत,  राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी बैठक घेऊन संपूर्ण प्रक्रियेची माहिती देण्याच्याही सूचना त्यांनी केल्या.

    मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकपणे राबविण्यात यावी, यावर भर देत वगळण्यात आलेल्या नावांची यादी ग्रामपातळीपासून तहसील कार्यालयापर्यंत प्रसिद्ध करावी. नाव वगळण्यामागील कारणांची स्पष्ट नोंद ठेवण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. ऑनलाइन प्रक्रियेबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी संपूर्ण माहिती करून घ्यावी तसेच बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

    प्रत्येक घराला १० जूनपर्यंत घर क्रमांक देण्यात यावा आणि त्याची अचूक नोंद ठेवण्यात यावी. SIR प्रक्रियेत कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना श्री चक्कलींगम यांनी दिल्या. प्रत्येक मतदाराचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक व्यवस्थित नोंदवून नवीन छायाचित्रे घेण्यात यावीत, असेही त्यांनी सांगितले.

    नागरिकांची कामे सुलभ पद्धतीने व्हावीत यासाठी BLO यांच्याकडे कोरे अर्ज उपलब्ध ठेवावेत. नाव चुकणे किंवा इतर अडचणी निर्माण झाल्यास तातडीने त्यावर कार्यवाही करण्यात यावी. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केले.

No comments