श्रीमंत संजीवराजे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी - रेश्माताई भोसले यांची सातारा येथील सभेत मागणी
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि २२ - फलटणचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे आचार, विचार व संस्काराने समृद्ध असे सुसंस्कृत व उच्चशिक्षित नेतृत्व असून त्यांना विधान परिषदेवर पाठवून न्याय द्यावा, तसेच तालुक्यापुरते मर्यादित न ठेवता जिल्हा पातळीवर नेतृत्व सिद्ध करण्याची संधी द्यावी, अशी मागणी पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्माताई भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
सातारा येथील गांधी मैदानावर सोमवार, दि. २० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरपालिका पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना रेश्माताई भोसले यांनी सांगितले की, संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षाला फलटण तालुक्यात भक्कम बळ मिळाले. त्यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीच्या १६ पैकी ८ जागांवर तसेच जिल्हा परिषदेच्या ८ पैकी ५ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. या यशातून त्यांची संघटन क्षमता आणि नेतृत्व स्पष्ट होते.
त्यामुळे अशा सक्षम नेतृत्वाला विधान परिषदेवर संधी देऊन त्यांच्या कार्याला योग्य न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments