Breaking News

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल ७० लाखांची फसवणूक

Fraud of Rs 70 lakhs in the name of stock market investment

    सातारा ( गंधवार्ता वृतसेवा) दि.८ - देगाव फाटा परिसरातील आशीर्वाद कॉलनी येथे राहणाऱ्या नागरिकांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ७० लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी दोन जणांविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वेता सिंग आणि मुकुंद कोचर(पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही)अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

    याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्रीम जर्नी क्लब या ग्रुपचे अ‍ॅडमिन श्वेता सिंग आणि मुकुंद कोचर यांनी सांगितल्या प्रमाणे फिर्यादी नितीन विष्णू निकम त्यांची बहीण इशा गजानन जाधव आणि पत्नी रूपाली नितीन निकम यांच्या बँक खात्यावरून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. जास्त नफा मिळेल असे सांगून त्यांनी फिर्यादीसह नातेवाईकांकडून ६ डिसेंबर २०२५ ते ९ जानेवारी २०२६ दरम्यान विविध बँक खात्यांद्वारे एकूण ७० लाख,८८ हजार रुपये घेतले.

    मात्र गुंतवणुकीवर कोणताही परतावा न देता संबंधितांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी श्वेता सिंग आणि मुकुंद कोचर या दोघांविरोधात सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे करत आहेत.

No comments