फलटण पंचायत समितीत ओबीसी आरक्षणावर घाला? ओबीसीसे पंगा, महंगा पडेगा - भाजप ओबीसी सेल अध्यक्षांचा राजीनामा?
फलटण (ॲड. रोहित अहिवळे) दि.१६ मार्च २०२६ : फलटण पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या पदावर कुणबी-मराठा दाखला असणाऱ्या सदस्याची बिनविरोध निवड करण्यात आल्याने, तालुक्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. ओबीसी प्रवर्गाला डावलून ही निवड झाल्याचा आरोप होत असून, राजकीय वर्तुळात “OBC से पंगा महंगा पडेगा” अशी चर्चा रंगू लागली आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप फलटण तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष तथा विडणी गावचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ओबीसी सेल अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करताना मनोजदादा जरांगे पाटील यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले होते की, मराठा समाजाला आरक्षण हे केवळ शिक्षण व नोकरीसाठी हवे आहे. मात्र त्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून फलटण पंचायत समितीतील ओबीसी आरक्षणावर कुणबी-मराठा दाखल्याच्या आधारे सदस्याची सभापतीपदी निवड करण्यात आल्याची चर्चा सध्या फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यात जोर धरू लागली आहे.
या प्रकरणामुळे ओबीसी संघटनांमध्ये नाराजी वाढत असून पुढील काळात यावरून राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments