श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शनात ‘राधा’ जगातील सर्वात बुटकी म्हैस ठरतेय आकर्षण
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ -फलटण येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शनामध्ये विविध नावीन्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण बाबी नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यामध्ये जगातील सर्वात बुटकी म्हैस ‘राधा’ हे प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरत असून तिला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
मलवडी (ता. मान, जि. सातारा) येथील त्रिंबक दाजी बोराटे यांच्या मालकीची असणारी ‘राधा’ ही म्हैस जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून ओळखली जाते. दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी तिची जिनियस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद झाली आहे. अवघ्या दोन फूट आठ इंच उंचीची ही म्हैस सध्या तीन वर्षांची असून तिच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या कृषी प्रदर्शनातील आणखी एक अनोखे आकर्षण म्हणजे ‘शंभू’ नावाचा कोंबडा. जन्मत:च आंधळा असलेला हा कोंबडा नागरिकांमध्ये विशेष कुतूहल निर्माण करत आहे. इतर कोंबड्यांच्या तुलनेत शंभू कोंबड्याला दहा नखे असून त्याचे वय सुमारे एक वर्ष आहे. या दुर्मिळ वैशिष्ट्यांमुळे शंभू कोंबड्यालाही पाहण्यासाठी प्रदर्शनात मोठी गर्दी होत आहे.
श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शनामुळे शेतकरी, पशुपालक तसेच नागरिकांना दुर्मिळ प्रजाती व निसर्गातील अद्भुत वैशिष्ट्ये प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळत असून प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
.jpg)
No comments