राझिया मेटकरी यांचा पालिका निवडणुकीतील पराभव अनेकांच्या जिव्हारी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ -फलटण नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) यांच्या उमेदवार राझिया मेहबूब मेटकरी यांना अत्यंत कमी मतांनी पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव केवळ राजकीय नसून, सामान्यतील सामान्य नागरिकालाही जिव्हारी लागणारा ठरला आहे.
राझिया मेटकरी या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले मेहबूबभाई मेटकरी यांच्या कन्या आहेत. विशेष म्हणजे मागील पंचवार्षिक निवडणुकीत मेहबूबभाई मेटकरी यांनाही याच प्रभागातून निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी राजे गटाची सत्ता असतानाही आणि हा प्रभाग त्यांचा बालेकिल्ला मानला जात असतानाही, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली मेहबूबभाई मेटकरी यांनी सक्षम लढत देत दादांची राजकीय ताकद या प्रभागात वाढवली होती. दादांचे कट्टर व एकनिष्ठ कार्यकर्ते अशीच त्यांची ओळख आहे.
कोविडसारख्या भीषण संकटाच्या काळात मेहबूबभाई मेटकरी यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. त्या काळात नातेवाईकही जवळ येण्यास कचर करत असताना त्यांनी कोणताही जात-पात, भेदभाव न करता स्वतःच्या खर्चातून गरजूंना किराणा सामान वाटप केले, रुग्णांना औषधे पुरवली तसेच रोजगार, अन्नाची टंचाई भासणाऱ्या कुटुंबांना आधार दिला.
राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. कोणतेही अधिकृत पद नसतानाही रणजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील पाणीपुरवठा, पाईपलाईन, रस्त्यांचे काँक्रिटीकरण यांसारखी विकासकामे मार्गी लावण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. तसेच पंतप्रधान आवास योजनेतून गरजूंना घरकुल मंजूर करून देणे, बांधकाम कामगारांना साहित्य व भांडी संच उपलब्ध करून देणे अशी अनेक कामे त्यांनी केली आहेत.
‘अहद सामाजिक संस्था’चे ते अध्यक्ष असून या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक कार्य सुरू आहे. सर्वधर्मसमभाव जपणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख असून सामाजिक सलोखा राखण्यासाठी दरवर्षी दहीहंडी उत्सव, गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरे, शालेय साहित्य वाटप, रुग्णांना फळे वाटप असे उपक्रम नियमितपणे राबवले जातात.
एवढ्या मोठ्या सामाजिक व राजकीय कार्याचा वारसा असतानाही राझिया मेटकरी यांचा झालेला निसटता पराभव अनेकांना वेदनादायी ठरला आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिक व जनसामान्यांमधून पक्ष नेतृत्वाने मेहबूबभाई मेटकरी यांचा स्वीकृत नगरसेवक म्हणून नक्कीच विचार करावा, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे.

No comments