मालक व भाडेकरू यांचा वाद असताना पणन संचालकांकडे का बोट दाखवता - ॲड. नरसिंह निकम
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १३ ऑक्टोबर २०२५ - गाळा भाडे वाढवून कृषी उत्पन्न बाजार समितीने गाळाधारकांवर अन्याय सुरू केला असून, पणन संचालकांचे कारण पुढे करीत आहेत, बाजार समिती मालक आहे, गाळाधारक भाडेकरू आहेत, हा वाद इथला असताना, तुम्ही वेळ काढूपना करीत असून, या ठिकाणी पणन संचालकांचा काहीही संबंध नाही, त्यामुळे तुम्हीच ही भाडेवाढ मागे घ्या अन्यथा हे उपोषण सुरूच राहील असे स्पष्ट मत ॲड नरसिंह निकम यांनी मांडले.
कृषी उत्पन्न बाजार समितीने गाळा भाडे दुप्पट करून गाळाधारकांवर अन्याय सुरू केल्याच्या निषेधार्थ फलटण येथील तहसील कार्यालयाच्या समोर संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीसिंह नाना पाटील चौक ते तहसील कार्यालय अशी फेरी काढून लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.
यावेळी बोलताना ॲड नरसिंह निकम यांनी, हे गलाधारक सर्व नियमाला अधीन राहून आपला व्यवसाय करीत आहेत, मात्र केवळ आणि केवळ द्वेशातून ही भाडेवाढ करीत, फार मोठा अन्याय करीत असल्याचे स्पष्ट करीत, पणन संचालकांचे कारण पुढे करीत केवळ आणि केवळ भाडेवाडीचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व संचालक मंडळ करीत असल्याचा आरोप करीत सुरुवातीपासूनच बाजार समितीने पिण्याचे पाणी, शौचालय, झाडलोट, स्वच्छता तथा इतर कोणत्याही सुविधा कधीच पुरवल्या नाहीत तसेच गाळेधारकांनी कोणतेही पोट भाडेकरू ठेवले नसल्याने कोणत्याही गोष्टीचा भंग करण्याचा प्रश्नच येत नाही, त्यामुळे ही भाडेवाढ अन्यायकारक असून ती मागे घ्यावीच लागेल, अन्यथा ऐन दिवाळीत आम्हाला ही भाडेवाढ रद्द होईपर्यंत कोणताही दुसरा पर्याय नाही, त्यामुळे आम्ही उपोषण रद्द करणार नाही असे सांगितले.
मुळात ही भाडेवाढ समितीच्या उपविधीतील तरतुदींच्या विरोधात तसेच कायद्यातील तरतुदींविरुद्ध केलेली असून आमची आर्थिक पिळवणूक होणार आहे त्यामुळे याबाबत विचारले असता चेअरमन व सचिव यांनी दमदाटी करीत हे गाळे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप ॲड नरसिंह निकम यांनी केला.
उपोषणास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भेट व पाठिंबा
दिवाळीचा सन तोंडावर असताना व्यापाऱ्यांना आपल्या न्याय हक्कासाठी उपोषण करावे लागत आहे, हे मोठं दुर्दैव असून, ही भाडेवाढ ताबडतोब रद्द करा, दिवाळी असताना शिमगा का करताय असा प्रश्न बाजार समितीला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विचारला.
No comments