समाजसेवेचे दीपस्तंभ बापूसाहेब तुकाराम तथा बी.टी. जगताप
फलटण तालुक्यातील आणि सातारा जिल्ह्यातील समाजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे नाव म्हणजे बापूसाहेब तुकाराम उर्फ बी.टी. जगताप. आज त्यांचा 61 वा वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या सामाजिक कार्याचा घेतलेला आढावा. सामाजिक बांधिलकी, विचारप्रवर्तक कार्य आणि जनहिताची अखंड धडपड या सर्व गोष्टींचा मागोवा घेण्याची ही योग्य वेळ आहे. चार दशकांपासून शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेवर आधारित सामाजिक कार्य करत, त्यांनी समाजातील वंचित घटकांसाठी न्याय, शिक्षण आणि समानतेचा आवाज बुलंद केला आहे.
1992 साली स्थापन झालेल्या प्राथमिक आश्रम शाळा, निंभोरेचे ते सचिव असून, शिक्षण क्षेत्रात त्यांनी अनेक वंचित मुलांच्या आयुष्याला दिशा दिली. शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा प्रमुख मार्ग आहे, हे तत्व त्यांनी आचरणात उतरवले आहे.
1995 पासून ते सातारा जिल्हा दलित सेनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून, त्यांनी समाजातील दुर्बल घटकांचे प्रश्न शासनदरबारी मांडले. याच काळात माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर रेल्वे आणि दूरसंचार मंत्रालयाच्या सल्लागार समित्यांवर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
2004 पासून छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली, जी आज एक सामाजिक चळवळ बनली आहे. विद्यार्थीवर्गावरही त्यांचा विशेष ओढा असून, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून त्यांनी अनेकांना शिक्षणात टिकून राहण्यास मदत केली.
2009 साली आयोजित सामूहिक विवाह सोहळा हा त्यांच्या सामाजिक कार्यातील एक मैलाचा दगड ठरला. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिलासा देणारी ही उपक्रमशीलता त्यांची ओळख बनली. कोविड काळातही त्यांनी जीवाची पर्वा न करता कार्य केले आणि “कोविड योद्धा” म्हणून अनेकांना गौरवांकित केले आहे.
त्यांच्या निःस्वार्थ कार्याची दखल घेत, पद्मश्री शंकर बापू आपेगावकर चारिटेबल ट्रस्ट, धाराशिव यांच्या वतीने “जगद्गुरु संत तुकाराम महाराज पर्यावरण पुरस्कार – 2025” ने त्यांना गौरविण्यात आले. तसेच मानवतावादी सांस्कृतिक चळवळ, दीक्षा चारिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्या वतीने त्यांना “राजश्री शाहू शास्त्रीय सन्मान पुरस्कार – 2025” ने सन्मानित करण्यात आले.
बापूसाहेब जगताप यांचे कार्य हे केवळ पुरस्कारापुरते मर्यादित नाही, तर ते सामाजिक परिवर्तनाच्या मातीतील उगवलेले तेजस्वी फूल आहेत. त्यांचे आयुष्य ही एक प्रेरणादायी कहाणी आहे विचार, कृती आणि सेवाभाव यांची.
आज त्यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त सर्व समाजबांधवांकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा — “दीर्घायुषी व्हा, निरोगी राहा आणि समाजसेवेची ही वाट अधिक तेजोमय करा

No comments