नवरात्रोत्सवी ‘महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे’ भव्य सादरीकरण;आयडियल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटणतर्फे भक्तिभाव, संस्कार आणि स्त्रीशक्तीचा संगम
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - भारतीय संस्कृतीत नवरात्र हा देवीच्या विविध रूपांचा उत्सव मानला जातो. स्त्रीशक्तीचा गौरव, भक्तिभावाची अनुभूती आणि परंपरेचे जतन या सर्वांचा सुंदर संगम साधत आयडियल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण तर्फे मंगळवार, दि. ३० सप्टेंबर रोजी माळजाई मंदिरात एक अविस्मरणीय सांस्कृतिक सोहळा पार पडला.
ढोल-ताशांच्या गजरात घुमणारे “ऐगिरी नंदिनी” या महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे सादरीकरण चौथी ते नववी इयत्तेतील विद्यार्थिनींनी भक्तिभावाने केले. हे स्तोत्र सामूहिक उच्चारताना मंदिर परिसरात जणू “जगदंबेचा विजयघोष”च दुमदुमत होता. समोर सुंदर सजवलेल्या चौरंगावर नवदुर्गांच्या रूपात मुली विराजमान झाल्या होत्या. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी व सिद्धिदात्री – या देवीच्या नऊ रूपांची जिवंत अनुभूती त्या क्षणी सर्वांना झाली.
या पावन क्षणी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ. वैशाली शिंदे मॅडम यांनी सर्व ‘नवदुर्गा’ तसेच स्तोत्रामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थिनींची पाद्यपूजा करून औक्षण केले, त्यांना भेटवस्तू व प्रसाद देऊन सन्मानपूर्वक पूजन केले. मुलींच्या चेहऱ्यावरचे तेज व भक्तिभाव पाहून जणू देवी स्वतः त्यांच्या रूपात प्रकट झाली असल्याची अनुभूती सर्वांना झाली.
यानंतर वातावरणात अजून एक पारंपरिक रंग भरला तो म्हणजे भोंडला. महाराष्ट्रातील स्त्रियांचा हा पारंपरिक सामूहिक खेळ नवरात्राच्या काळात आनंद, ऐक्य आणि भगवतीचे स्मरण यासाठी खेळला जातो. टाळ्यांच्या गजरात गाणी म्हणत फेर धरला जातो आणि हा खेळ स्त्री-एकतेचे प्रतीक मानला जातो. या कार्यक्रमासाठी मध्यभागी गजराजाची भव्य मूर्ती ठेवण्यात आली. या मूर्तीचे पूजन डॉ. सौ. वैशाली शिंदे मॅडम यांनी केले. या गजराजाच्या मूर्तीभोवती नवदुर्गा उभ्या राहून एक अद्भुत दिव्यता निर्माण करत होत्या. त्यानंतर पहिली ते तिसरीच्या मुली, प्री-प्रायमरीच्या विद्यार्थिनी, शिक्षकवर्ग व पालकांनी मिळून टाळ्या व गाणी म्हणत फेर धरला. “ऐलमा पैलमा गणेश देवा…” अशा गाण्यांवर सादर झालेला हा सामूहिक खेळ स्त्री-एकतेचे, पारंपरिक संस्कृतीचे आणि आनंदसोहळ्याचे प्रतीक ठरला.
या कार्यक्रमाला माळजाई मंदिर व उद्यान समितीचे अध्यक्ष ला. प्रमोद अण्णा निंबाळकर, लायन आय हॉस्पिटलचे चेअरमन अर्जुनराव घाडगे, ला. चंद्रकांत कदम, ला. दिलीप शिंदे, ला. महेश गरवालिया, ला. स्विकार मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींच्या अप्रतिम सादरीकरणाचे कौतुक करत शाळेच्या सांस्कृतिक उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.
या भव्य कार्यक्रमाचे श्रेय संपूर्णपणे डॉ. सौ. वैशाली शिंदे मॅडम यांनाच जाते. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळेच विद्यार्थिनींनी फक्त स्तोत्र म्हटले नाही, तर त्यामागील संस्कार आत्मसात केले. मॅडमनी मुलींना शिकवले की “नवरात्र हा केवळ उत्सव नाही, तर स्त्रीशक्तीचा गौरव, आत्मबळाची जाणीव आणि परंपरेचे जतन करण्याचा सोहळा आहे.”
या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये भक्ती, शिस्त, सामूहिकता, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक मूल्यांचा वारसा रुजवण्यात आला.
संगीत शिक्षिक संकेत सर, संजना मॅडम आणि कोरिओग्राफर प्रशांत भोसले सर यांनीही या कार्यक्रमाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. समारोप प्रसंगी सेंटर हेड सौ. सुचिता जाधव मॅडम यांनी आभारप्रदर्शन केले.
अशा रीतीने नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर झालेला हा कार्यक्रम स्त्रीशक्तीचा गौरव, भक्तिभावाची अनुभूती आणि संस्कारांचा अमूल्य ठेवा देऊन सर्वांच्या मनात कोरला गेला.
No comments