सरस्वती शिक्षण संस्थेचा १८ वा वर्धापन दिन, पांडुरंग पवार भाऊ यांचा वाढदिवस आणि माजी प्राचार्यांचा निरोप समारंभ उत्साहात
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ सप्टेंबर २०२५ - शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य घडवून आणणाऱ्या सरस्वती शिक्षण संस्थेचा १८ वा वर्धापन दिन आणि संस्थेचे मार्गदर्शक पांडुरंग बाजीराव पवार (भाऊ) यांचा वाढदिवस दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी येथे मोठ्या थाटामाटात व उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाला सरस्वती शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक पांडुरंग पवार भाऊ, सौ सुलोचना पवार , तसेच ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, मुधोजी हायस्कूलचे माजी प्राचार्य रवींद्र येवले, लायन्स क्लब गोल्डन फलटण अध्यक्ष व सरस्वती शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. संध्या गायकवाड , श्री विकास गायकवाड, योग शिक्षक श्री सुनील शिंदे व सौ विद्या शिंदे , मयुरी किनगी, ला उज्ज्वला निंबाळकर , ला सुनीता कदम , श्री अमित सस्ते, प्राचार्या सुजाता गायकवाड आदी मान्यवर म्हणून व्यासपीठावर विराजमान होते.
सुरुवातीला विधीपूर्वक सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. आलेल्या मान्यवरांचे वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक पर्यवेक्षक महेंद्र कातुरे यांनी केले. त्यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या शैक्षणिक प्रवासाचा, विद्यार्थ्यांना दिलेल्या संधींचा आणि समाजकारणाशी असलेल्या नात्याचा सविस्तर आढावा उपस्थितांसमोर ठेवला.
यानंतर संस्थेचे मार्गदर्शक व सर्वांचे लाडके पांडुरंग पवार (भाऊ) यांचा वाढदिवस औक्षण करून व केक कापून साजरा करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मा श्री अरविंद मेहता यांचा देखील त्यांच्या नुकत्याच झालेल्या अमृतमहोत्सवानिमित्त सन्मान व सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. आदरणीय श्री रवींद्र येवले सरांचे देखील सातत्याने संस्थेला व संस्थेच्या शिक्षकांना सर्वतोपरी मार्गदर्शन मिळत असते त्याबद्दल त्यांचा देखील संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याचबरोबर श्री सुनील शिंदे व विद्या शिंदे या उभयतांना मिळालेल्या योगरत्न पुरस्काराबद्दल व फलटण मधील लोकांच्या निरोगी जीवनमान राखण्यासाठी सातत्याने चालू असलेल्या त्यांच्या मेहनतीबद्दल त्यांचा देखील सन्मान व सत्कार या औचित्याने करण्यात आला.
या सोहळ्यात संस्थेचे माजी प्राचार्य अमित सस्ते यांचा निरोप समारंभही आयोजित करण्यात आला. संस्थेच्या कार्यकाळात योगदान देणाऱ्या उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सौ. दीपा अविनाश पाडळे, सौ. मेघा मिलिंद जाधव, सौ. अमृता ज्ञानेश निंबाळकर व कु. प्रिया लक्ष्मण शेडगे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी सरस्वती शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. संध्या गायकवाड यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संस्थेतून घडलेले माजी विद्यार्थी व शिक्षक हेच संस्थेच्या यशाचे खरे मोजमाप असल्याचे त्या म्हणाल्या. श्री अमित सस्ते सरांनी संस्थेप्रति कृतज्ञता व्यक्त केली व आभार मानले. योगशिक्षिका विद्या शिंदे यांनी संस्थेला शुभेच्छा देत या संस्थेत गेली 2 वर्षे काम करतानाचा अनुभव खूप चांगला असल्याचे नमूद केले. तसेच मा श्री अरविंदभाई मेहता यांनी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देऊन संस्थेच्या शिक्षकांना त्यांच्या चांगल्या, गुणवत्तापूर्ण कामाबाबत कौतुक ही केले. भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भाऊंच्या कारकिर्दीचा व संस्थेच्या घडामोडींचा आढावा घेत त्यांचे विचार, संस्कार व समाजसेवेची वृत्ती , कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाप्रति असणारी आत्मीयता अशा अनेक गोष्टी जाणीवपूर्वक मांडल्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री येवले सर यांनी शिक्षक हा देशाचा आधारस्तंभ आहे आणि आजची पिढी घडवत असताना शिक्षकांनी आनंदाने परिपूर्ण शिक्षण देण्याचा व सातत्याने होणारे बदल स्वीकारून विद्यार्थी घडविले पाहिजेत. विद्यार्थी समाजाचा खूप महत्त्वाचा घटक आहे त्यासाठी शिक्षकांचे व संस्थांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रोहिणी जाधव व सुप्रिया बनसोडे यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचे आभार सौ जयश्री घाडगे यांनी मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.एकंदरीत, सरस्वती शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन,भाऊंचा वाढदिवस व निरोप समारंभ या तिन्ही सोहळ्यांची सांगड संस्मरणीय ठरली.
No comments