नऊ जिल्ह्यांसह पुणे, सातारा, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट
मुंबई, दि. २६ :- भारतीय हवामान विभागामार्फत राज्यात नांदेड, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर या नऊ जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परिसरात २७ सप्टेंबर २०२५ रोजीसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र या केंद्रीय संस्था सोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्यात सीना नदी वडकबाळ येथे धोका पातळीच्यावर वाहत आहे. तर टाकळी येथे भीमा नदी इशारा पातळीच्यावर वाहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सोलापूर येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची दोन पथके तैनात आहेत. तसेच सचेतच्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेच्या पूर्व सूचना देण्यात आल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात झालेल्या पावसामुळे आलापल्ली ते भामरागड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३० डी वरील भामरागड पर्लकोट दरम्यानचा वाहतुकीचा पूल पाण्याखाली गेला आहे. भामरागड येथे सुरक्षेच्या दृष्टीने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक तैनात करण्यात आले आहे. सद्यस्थितीत हेमलकसा ते लाहेरी या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक रस्त्याच्या दोन्ही बाजूना बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढविण्यात आला होता. यावेळी सचेतच्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेच्या पूर्व सूचना देण्यात आल्या होत्या. नांदेड शहर परिसरातील नांदेड जुनापूल येथे गोदावरी नदी धोका पातळीवर वाहत असल्याने संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते.
राज्यात मागील २४ तासात चंद्रपूर जिल्ह्यात ३१.७ मि.मी., गडचिरोली २९.२ मि.मी., लातूर २५.३ मि.मी., नांदेड १६.९ मि.मी. आणि गोंदिया जिल्ह्यात १६ मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
No comments