Breaking News

परदेशातील उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ पुरवण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra will remain at the forefront in providing the required skilled manpower to industries abroad – Chief Minister Devendra Fadnavis

    मुंबई, दि. १० : परदेशातील उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेवून त्यानुसार अभ्यासक्रमांचा प्रशिक्षणात समावेश करावा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाबरोबरच खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थासाठीही एक सक्षम यंत्रणा तयार करण्यात यावी. आयटीआयमार्फत राबविण्यात येणारे अल्पकालीन अभ्यासक्रम अधिक प्रभावीपणे राबवा. प्रशासनमार्फत केलेल्या सर्व सामंजस्य करारांचा आढावा सीएम डॅशबोर्डवर घेण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

    सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, आयुक्त लहूराज माळी, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, परदेशात आज कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे हे लक्षात घेवून या विभागाने काळानुरूप आवश्यक असे अभ्यासक्रम सुरू करावेत. रोजगार वाढीसाठी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम यंत्रणा तयार करावी. एखाद्या व्यक्तीने कौशल्य अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापासून ते अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंतची सर्व माहिती डिजिटली पद्धतीने तपासली जावी. शासकीय आयटीआय जागतिक दर्जाच्या कौशल्य केंद्रात रूपांतरीत करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात याव्या. ‘मित्रा’संस्थेकडूनही मार्गदर्शन घेण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

    जास्तीत जास्त उद्योजक तयार करणार : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

    कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच उपक्रमांची माहिती दिली. आयटीआयमध्ये सौर तंत्रज्ञ, इलेक्ट्रिक वाहन मेकॅनिक, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग (3D प्रिंटिंग), ड्रोन तंत्रज्ञ, औद्योगिक रोबोटिक्स, एआय प्रोग्रामिंग असिस्टंट असे अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील. शहरी, ग्रामीण व आदिवासी भागासाठी त्यांच्या गरजावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येतील असेही श्री.लोढा यांनी यावेळी सांगितले.

    अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांनी विभागाची रचना, योजना व सद्यस्थितीची माहिती सादरीकरणातून दिली. विभागातील नाविन्यपूर्ण उपक्रम, यशोगाथा याची देखील सविस्तर माहिती दिली.

    यावेळी महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीसोबत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने विविध प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार केला. महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा लिमीटेडचे प्रमुख प्रफुल्ल पांडे आणि महिंद्रा ॲण्ड महिंद्रा शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. लेविस यावेळी उपस्थित होते.

No comments