विडणी येथे उद्या महास्वच्छता अभियान; लोकसंख्ये एवढे वृक्षारोपण करणार - सर्वांनी सहभागी व्हावे - सरपंच सागर अभंग
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ सप्टेंबर २०२५ - मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025 मध्ये आपले विडणी हे गाव स्पर्धेत राहण्यासाठी सदरचे अभियानअंतर्गत शासनाच्या नियोजनानुसार आज गुरुवार 25 सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते अकरा या वेळेत विडणी गावात महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ त्याचबरोबर विडणी गावात महा श्रमदान अभियानातून गावातील ओढे, नाले, व गटारे तसेच गाव वडिवस्ती स्वच्छ करणे, रस्ते दुरुस्ती,डागडुजी व रस्त्यावर मुरूम टाकण्यात येणार आहे. हे अभियान मोठ्या प्रमाणात सर्व विडणी ग्रामस्थ तसेच महिला भगिनी व युवकांच्या पुढाकाराणे आपले गाव स्वच्छ व सुंदर हरित करण्याचे नियोजन केले असून, एक व्यक्ती एक झाड लावले जाणार असून गावाच्या लोकसंख्या प्रमाणे देशी झाडे लावली जाणार आहेत तरी यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी केले आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान (2025-26) या महत्त्वाकांक्षी अभियानाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाने घेतला आहे, आणि याचा शासन निर्णय दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी जारी करण्यात आला आहे. या अभियानाचा उद्देश जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या कार्यक्षमतेत वाढ करणे आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देणे आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या कामगिरीचे मूल्यमापन करून त्यांची कार्यक्षमता वाढवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे, राज्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहन देण्यासाठी तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर हे अभियान राबवले जात आहे,आणि त्यांना पुरस्कार ही दिले जाणार आहे,राज्य शासनाच्या योजनांचा प्रभाव वाढवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन देण्याची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून आपले विडणी गाव यामध्ये सहभागी झाले असून सर्व ग्रामस्थांनी यामध्ये सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी केले आहे.
No comments