सोहम टेंबरे जाणार अमेरिकेत नासाच्या भेटीला ; फलटण तालुक्याचा वाढविला मान
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ - सोहम टेंबरे रा.सांगवी ता.फलटण येथील सर्वात कमी म्हणजे सातवीतील हा विद्यार्थी आयुका मार्फत अमेरिकेत असलेल्या नासाच्या भेटीला जाणार असून, त्याच्या निवडीने त्याने फलटण चे नाव सातासमुद्रापार नेले असून त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीने सर्वात कमी वयाचा विद्यार्थी होण्याचा बहुमान मिळाला असून त्याने फलटण तालुक्याचा वाढविला मान अशी चर्चा सुरू आहे.
सांगवी ता. फलटण येथील सोहम विजय टेंबरे हा पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सांगवी ता. बारामती या शाळेत इयत्ता सातवीत शिकत आहे. पुणे जिल्हा परिषदेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या 'जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नासा व इस्रो भेटीची संधी' या उपक्रमांतर्गत आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र व खगोलभौतिकशास्त्र केंद्र (आयुका) यांचेकडून घेण्यात आलेल्या निवड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या नवोपक्रमा साठी पुणे जिल्हा परिषद शाळेतील जिल्हाभरातून जवळपास 14 हजार विद्यार्थी बसले होते. यातून केवळ 25 विद्यार्थ्यांना अंतिम यादीत स्थान मिळाले, यामध्ये सांगवीच्या सोहम टेंबरे या विद्यार्थ्याने नियमित अभ्यास, मेहनतीच्या जोरावर आपले स्थान निश्चित केले आहे.
यापूर्वीही सोहमने विविध सहशालेय उपक्रम व जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून आपली गुणवत्ता वेळोवेळी सिद्ध केली आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निवडीमुळे त्याला अंतराळ संशोधन क्षेत्राची प्रत्यक्षात माहिती घेण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.सोहम हा मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सांगवी गावचे सुप्रसिद्ध मॅरेथॉन धावपटू विजय टेंबरे यांचा सुपुत्र असून त्याला त्याच्या शाळेतील वर्गशिक्षिका सौ. सुनीता अर्जुन खलाटे व सर्व सहकारी शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
अमेरिकेतील नासा संशोधन संस्था ही अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुणे जिल्हा परिषदेमार्फत विमान वाहतुकी द्वारे नेले जाणार आहे. पृथ्वी, तंत्रज्ञान, अंतराळ विषयीच्या वैश्विक बाबींचा अभ्यास करणाऱ्या या नासा संस्थेच्या दौऱ्यासाठी सोहमची निवड झाल्याने त्यालाही वैश्विक माहिती जाणून घेण्याची अनोखी संधी मिळणार आहे. या उत्तुंग यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
दरम्यान त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीने आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार व सीईओ गजानन पाटील यांनी त्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,तो पुढील अभ्यासासाठी संपूर्ण खर्च पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
साताऱ्यातील सर्वात कमी वयात नासा भेटीचा बहुमान
सातारा जिल्ह्याचा सुपुत्र असणाऱ्या सोहम टेंबरे हा केवळ 13 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय दौऱ्यासाठी नासा येथे जात असल्याने तो सर्वात कमी वयात नासाला भेट देणारा विद्यार्थी ठरला आहे. सातारा जिल्हावासीयांसाठी ही बाब गौरवाची असल्याचे बोलले जात आहे.
No comments