बारामतीच्या धर्तीवर फलटण कॅनॉल परिसराचे सुशोभीकरण करणार - आ. सचिन पाटील
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ ऑगस्ट २०२५ - फलटण शहरातून जाणाऱ्या निरा उजवा कालवा परिसराचे बारामतीच्या सारखे सुशोभीकरण करण्यात यावे अशी लोकांची अनेक दिवसांपासून मागणी होती, ती विचारात घेत फलटणला देखील तसेच सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे आमदार सचिन पाटील यांनी जाहीर केले.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून बारामती मध्ये ज्या पद्धतीने सुशोभिकरण झाले आहे, त्याच धर्तीवर आकर्षक पद्धतीने फलटण मध्ये केले जाणार आहे. त्यासाठी काल बारामती कॅनॉलची पाहणी मा खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचे पदाधिकाऱ्यांच्या सोबतकरण्यात आली.
यावेळी जिंतीनाका ते रावरामोशी पुल दोन्ही बाजूने डांबरीकरण, कॅनॉलचे अस्तरीकरण, कॅनॉलच्या दोन्ही भागांना अद्यावत सुशोभीकरण यामध्ये पेविंग ब्लॉक,वृक्षारोपन, लहान मुलांना खेळण्यासाठी अद्ययावत पार्क, ओपन जिम, जेष्ट नारिकांसाठी बसण्याची बाकडे, आकर्षक पथ दिवे ,तसेच विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात येणार आहेत, यामुळे या शहराला वेगळेपण येणार आहे. ज्या जनतेने मला निवडुन दिले त्यांच्या अपेक्षा मा.खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व महायुतीचे नेत्यांचे मार्गदर्शनाखाली पुर्ण करणार आहे असे मत आमदार सचिन पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
बारामती कालवा पाहणी दौऱ्यात धोम बलकवडी व नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता बोडके, गपाट साहेब, श्री कोकरे साहेब, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, गटनेते अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, तुकाराम शिंदे,सिराजभाई शेख, अमोल सस्ते, रणजीतबाबा भोसले हे मान्यवर उपस्थित होते.
No comments