Breaking News

विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभावाचे बीज रोवणारा आयडियल इंटरनॅशनल स्कूलचा संस्कारक्षम ' वारी सोहळा

Ideal International School's 'Vari' ceremony, which sows the seeds of devotion among students

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : आयडियल इंटरनॅशनल स्कूल, लक्ष्मीनगर व बिरदेवनगर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने चैतन्य विहार, फलटण येथे भव्य वारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये भक्तिभाव रुजवणारा, संस्कारांची शिदोरी देणारा व ऐक्याचे प्रतीक असणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

    या कार्यक्रमात शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्त परायण ह.भ.प. केशवराव जाधव महाराज, फलटणमधील नामांकित आर्थोपेडिक सर्जन डॉ. प्रसाद जोशी सर, गिरीधर अकॅडमीचे व आयडियल इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर शिवराज भोईटे सर, मयूर भोईटे सर यांची उपस्थिती लाभली होती.

    सर्व विद्यार्थी पारंपरिक वारकरी वेशभूषेत आले होते. लहानग्या वारकऱ्यांनी परिसरात भक्तिभावाने भारावलेले वातावरण निर्माण केले. कार्यक्रमाची सुरुवात माऊलींच्या पादुकांच्या पूजनाने झाली. पूजन व आरती ह.भ.प. केशवराव जाधव महाराज व आयडियल इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापिका डॉ. सौ. वैशाली शिंदे मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पालखीच्या समोर चिमुकल्या विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशातील विद्यार्थी व पालखीचा घोडा यांची आकर्षक मिरवणूक होती. प्ले ग्रुपपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या दिंड्यांनी उत्साह वाढवला. "विठू नामाचा गजर" करत ही पालखी चैतन्य विहारच्या लॉनवर पोहोचली.

    त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सन्मान सोहळा पार पडला. आयडियल स्कूलचे सेक्रेटरी निखिल सर यांच्या हस्ते ह.भ.प. केशवराव जाधव महाराज यांना शाल, श्रीफळ व ग्रंथ देऊन गौरवण्यात आले. त्याचबरोबर केशवराव महाराजांच्या हस्ते शाळेच्या संस्थापिका डॉ. सौ.वैशाली शिंदे मॅडम यांचा देखील सन्मान करण्यात आला.

    कार्यक्रमात इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी "राम राम जय जय राम" व "पाऊले चालती पंढरीची वाट" या अभंगांचे सादरीकरण केले. इयत्ता सहावीच्या वरूण जाधव याने 'नामाचा महिमा' या विषयावर कीर्तन सादर केले.

    यानंतर फलटणचे नामांकित आर्थोपेडिक सर्जन डॉ. प्रसाद जोशी यांचा सन्मान आयडियल इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापिका डॉ.सौ. वैशाली शिंदे मॅडम, गिरीधर अकॅडमी व आयडियल इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर शिवराज सर, शाळेच्या डायरेक्टर सौ. सुचिता जाधव मॅडम, आणि ह.भ.प. केशवराव जाधव महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांना 'फलटण भूषण' हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    डॉ. प्रसाद जोशी सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.' विठ्ठल ' नामाचे उच्चारण हृदयाच्या आरोग्यासाठी कसे लाभदायी ठरते हे सांगून सर्वांचे मार्गदर्शन केले.

    शाळेचे डायरेक्टर शिवराज भोईटे सर व मयूर सर यांचा सन्मान सेक्रेटरी निखिल सर यांच्या हस्ते करण्यात आला. याचबरोबर आयडियल कोरिओग्राफर प्रशांत भोसले सर यांचा सन्मानही करण्यात आला.

    यानंतर, गिरीधर अकॅडमी व आयडियल इंटरनॅशनल स्कूलमधील इ. १० वी व इ.१२वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा डॉ. प्रसाद जोशी सर यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.

    यानंतर विद्यार्थ्यांचा भव्य वारकरी नृत्य व रिंगण सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडले. या रिंगण सोहळ्यात घोड्याचे रिंगण लक्षवेधी ठरले. नृत्य व रिंगण सोहळ्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले होते. उपस्थितांनी याचा मनमुराद आनंद घेतला. विठ्ठलनामाच्या गजरात सारा परिसर दुमदुमून गेला.

    कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ व प्रसाद वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या डायरेक्टर सौ. सुचिता जाधव मॅडम व सेंटर हेड सौ. पूजा बाबर मॅडम यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने पार पाडले.

    हा संपूर्ण कार्यक्रम आयडियल इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापिका डॉ. सौ.वैशाली शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार आणि सांस्कृतिक जाणीव जागवण्यासाठी त्यांचे सातत्याने घेतले जाणारे उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेचा सर्वांगीण विकास होत असून अशा उपक्रमातून शाळेचे वेगळेपण सातत्याने सिद्ध होत आहे.

No comments