ग्राहक चळवळीत काम करणारांसाठी 'ग्राहक पंचायत महाराष्ट्र' हे एक वैभव : डॉ. विजय लाड ; किरण बोळे यांना पुरस्काराचे वितरण
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ जुलै २०२५ - देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील ग्राहक हा शोषणमुक्त झाला पाहिजे ही ग्राहक चळवळीची धारणा आहे. ग्राहक पंचायतीचा कार्यकर्ता हीच तुमची समाजातील खरी ओळख आहे. शोषणमुक्त समाज निर्माण करण्याचे ध्येय आपल्या उरी बाळगून कार्यरत असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी 'ग्राहक पंचायत महाराष्ट्र' हे एक वैभव आहे, असे प्रतिपादन संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी केले.
धाराशिव येथील दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनात 'उत्कृष्ट कार्यकर्ता' पुरस्कार वितरण प्रसंगी व अध्यक्षीय भाषणामध्ये ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर संघटनेचे राज्य सचिव अरुण वाघमारे, राज्य संघटक सर्जेराव जाधव, सह संघटिका मेधा कुलकर्णी, कोषाध्यक्षा सुनिता राजेघाटगे, सहसचिव प्रा. एस.एन. पाटील, सदस्य प्रमोद कुलकर्णी, धाराशिव जिल्हाध्यक्ष अजित बागडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
किरण बोळे व अन्य कार्यकर्त्यांना मिळालेला उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार हा अन्य कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. त्यांची प्रेरणा घेऊन अन्य कार्यकर्ते मनापासून काम करतील व तेही या पुरस्काराला पात्र ठरतील अशी अपेक्षा व्यक्त करून डॉ. लाड म्हणाले, ग्राहकतीर्थ बिंदूमाधव जोशी यांना समर्पित भावनेने काम करणारा कार्यकर्ता अपेक्षित आहे, त्यांना जे जे अपेक्षित होते ते ते आपण जीवनव्रत म्हणून चालविले पाहिजे तरच ग्राहकतीर्थ बिंदूमाधवांना व स्वामी विवेकानंद यांना अनंत असा आशादाय व आशावाद आणि आनंद व समाधान होईल असे कार्य आपण करायला हवे. ग्राहक चळवळीत कार्यरत असणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांचा दृष्टिकोन हा संकुचित न राहता तो व्यापक असायला हवा, समाजासाठी काम करण्याची त्याची भूमिका असायला हवी. ज्ञान ही माणसाची दृष्टी असून ती ग्राहक चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येकाकडे असायला हवी. आपली ग्राहक चळवळ ही पसायदानवादी असल्याचेही डॉ. विजय लाड यांनी यावेळी सांगितले.
या वेळी किरण बोळे पुणे विभाग, देविदास नंदनवार नागपूर प्रांत, बी.एम. भामरे नाशिक विभाग, मराठवाडा विभाग आनंद कृष्णापूरकर, कोकण विभाग रत्नाकर कोळंबकर यांना 'उत्कृष्ट कार्यकर्ता' या पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुधा जहागीरदार यांनी, आभार प्रदर्शन प्रा. पूनम तापडिया यांनी केले. सदर अधिवेशनात राज्यभरातील विविध जिल्ह्यातून पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments