Breaking News

फलटण बारामती रस्त्याचे काँक्रिटीकरण निकृष्ट ; ठेकेदारावरावर कुणाचा वरदस्त

Concreting of Phaltan-Baramati road is poor; Whose hand is it over the contractor?

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ जुलै २०२५  - फलटण - बारामती महामार्गावर सुरू असलेले क्रॉंक्रीटीकरण जागोजागी खराब झाले असून,  कित्येक ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्या आहेत. त्या ठिकाणी नुकत्याच एका मोटरसायल स्वाराचा अपघात झाला असून,या भेगांमुळे अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत. कित्येक ठिकाणी रस्ता खचू लागला आहे. यावरूनच फलटण बारामती महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याचे दिसते. ठेकेदाराच्या गलथान कारभाराचे चित्र प्रत्येक प्रवाश्यांना रस्त्यावरून प्रवास करताना दिसत आहे. या निष्कृष्ठ कामाबद्दल अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत,  परंतु संबंधित ठेकेदाला काहीही फरक पडल्याचे दिसत नाही.  संबंधित ठेकेदारावर 'दादा' चा का "साहेबाचा"वरदहस्त आहे? याबाबत प्रवाश्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

    फलटण - बारामती रस्त्याच्या सिमेंट काॅक्रीटी करणाला मुर्त स्वरुप प्राप्त झाले असले, तरी ठेकेदाराच्या गलथान कारभारमुळे फलटण - बारामती महामार्गावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरण हे निकृष्ठ दर्जाचे झाले असुन, काम पुर्ण होण्याअधीच महामार्गावरील रस्त्यावर खड्डे पडून, रस्त्यावर असंख्य भेगा पडल्या आहेत. यामुळे रस्ता खचू लागला आहे. यावरुनच संबंधित विभागाच्या कामकाजाचे चित्र स्पष्ठपणे दिसत आहे. सदर ठेकेदारास चांगले सुनावले तरीही ठेकेदारास कोणताही फरक पडत नसल्याने 'येरे माझ्या मागल्या' सारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे फलटण व बारामती परिसरातुन बोलले जात आहे.

    या महामार्गावर कित्येक ठिकाणी बारामतीहून निघाल्यानंतर फलटण येई पर्यंत प्रत्येक प्रवाश्यास असंख्य खड्डे दिसू लागले आहेत. तसेच कित्येक ठिकाणचे रस्तेही खचू लागले आहेत. कित्येक ठिकाणी रस्त्यावरील खडी उचकटू लागल्याचेही दिसत आहे. सदर रस्त्याचे सबंधित विभागाने सूक्ष्म परीक्षण केल्यास सर्व बाबी स्पष्ट होतील व वास्तव समोर येईल.परंतु राजकारणी व अधिकारी मॅनेज असल्याची चर्चा सुरू झाली आहे,डांबरीकरण करण्यास प्रति किलोमीटर अंदाजे ७५ ते ८० लाख रुपये खर्च येतो. काँक्रीटीकरण करण्यासाठी प्रति किलोमीटर अंदाजे १ ते १.५ कोटी खर्च येतो. मात्र सिमेंटचे रस्ते हे २० ते ३० वर्षे टिकतात यामुळे देखभाल व दुरुस्तीचा खर्च टाळता येतो.हा उद्देश समोर ठेवून सरकारने सिमेंट काँक्रीटीकरणाचे रस्ते करण्याकडे भर दिला आहे. डांबरी रस्त्याच्या तुलनेत सिमेंटचे रस्ते हे अधिक मजबूत व टिकाऊ असतात. यामुळेच संपुर्ण देशात सर्व रस्ते हे सिमेंट काँक्रिटीकरणाचे करण्याचा वेग वाढू लागला आहे.

    फलटण - बारामती महामार्गाचे काम कित्येक वर्षे रखडले होते .सदर महामार्गाचे काम सुरू करण्यासाठी ग्रामस्थ व भुबाधित शेतकर्‍यांना कित्येक वेळा आंदोलने करावी लागली,वारंवार होणार्‍या तक्रारींची दखल घेत या महामार्गाच्या कामाला मुहूर्त सापडला.या महामार्गात ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या आहेत.अशा शेतकर्‍यांना अद्यापही मोबदला मिळाला नाही.सरते शेवटी सर्व भुबाधित शेतकर्‍यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.अद्यापही या महामार्गावरील लोकांना चालु दराप्रमाणे मोबदला मिळाला नाही.त्यामुळे शेतकरी उपाशी अन् ठेकेदार व अधिकारी तुपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

    फलटण -बारामती महामार्गाच्या सिमेंट क्रॅाक्रीटी करणाचे काम हे सोमंथळी ता.फलटण येथे पोलिसी खाक्या दाखवुन करुन घेतले आहे. फलटण - बारामती रस्त्यावरील सांगवी, सोमंथळी परिसरातील रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाला वेग आला आहे. एकीकडे काम सुरू असून दुसरीकडे रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. यावरून फलटण बारामती महामार्गाच्या एकूण कामाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या परिसरातील विकास कामांची कोणत्या अक्षरात नोंद घ्यावी असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

    बारामती - फलटण - शिरवळ हा महामार्ग गेले कित्येक वर्ष बंद अवस्थेत होता. या महामार्गाच्या कामासाठी कित्येक शेतकऱ्यांनी परिसरातील नागरिकांनी मोर्चे आंदोलने करून हा महामार्ग पूर्ण होण्याकडे शर्तीचे प्रयत्न केले हा महामार्ग सुरू झाला परंतु काही काळातच बंद पडला. महायुती सरकारने पुन्हा एकदा या महामार्गाकडे लक्ष दिले व महामार्ग उत्कृष्ट दर्जाचे टिकाऊदार बनवण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करुन दिला परंतु मलिदाखाऊ ठेकेदाराने व अधिकारी यांनी याबाबीकडे जानीवपुर्वक दुर्लक्ष केले व रेटोबा पद्धतीने काम करून अत्यंत निकृष्ट व दर्जाहीन काम केले. त्यामुळे रस्ता करून काही दिवसही उलटले नाहीत की रस्त्याच्या मधोमध खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. तसेच रस्ता ठिकठिकाणी खचू लागला आहे. परंतु या बाबी संबंधित ठेकेदाराला माहीत असूनही संबंधित ठेकेदार मूग गिळून गप्प का?असा प्रश्न नागरीक उपस्थित करत आहेत.

No comments