Breaking News

लायन्स मुधोजी आय हॉस्पिटलमध्ये आधुनिक मशनरी द्वारे होणार मोफत व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया - डॉ.शेखर कोवळे

Free and discounted surgeries will be performed at Lions Mudhoji Eye Hospital using modern machinery - Dr. Shekhar Kovale

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ जुलै २०२५ - फलटण लायन्स क्लबच्या माध्यमातून  लायन्स मुधोजी धर्मादाय नेत्र रुग्णालयाची सुरुवात गेल्या ६० वर्षांपूर्वी  करण्यात आली. या आय हॉस्पिटलच्या माध्यमातून आजपर्यंत   समाजातील अनेक गोरगरीब, गरजू, शेतकरी व शेतमजूर यांच्या डोळ्यांची ऑपरेशन अल्प दरात व मोफत केली  आहेत. यामध्ये लायन रतनसीभाई पटेल,लायन भोजराज नाईक निंबाळकर, लायन जगजीवन  गरवालिया, लायन राजीव नाईक निंबाळकर, ला.उल्हास भोईटे,  लायन अजित  गांधी यांचे योगदान लाभले.

    मात्र हे करीत असताना रुग्णालयामध्ये मशिनरींची संख्या कमी पडत होती. विविध नेत्र रुग्णांची सर्जरी करीत असताना अनेक अडचणी येत होत्या या अडचणीवर मात करण्याचे ठरवून मुधोजी लायन आय हॉस्पिटलचे विद्यमान अध्यक्ष लायन अर्जुन घाडगे, सचिव लायन चंद्रकांत कदम, खजिनदार जगदीश करवा, व्हॉइस चेअरमन लायन रतनसी पटेल,  लायन्स सुहास निकम, लायन मंगेश भाई दोशी, लायन रणजीत निंबाळकर, लायन राजीव नाईक निंबाळकर यांनी लायन्स क्लबच्या आंतरराष्ट्रीय संघटनेकडे अध्यायवत मशिनरी साठी १ कोटी १६  लाख ४९ हजार ८६७  रुपयाचा प्रस्ताव दाखल केला होता. त्यांच्या या प्रस्तावाला आंतरराष्ट्रीय लायन्स संघटनेने मान्यता देऊन त्यांना हे अनुदान अध्यायावत मशिनरीसाठी उपलब्ध करून दिले आहे.

    लायन्स क्लब हि आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी संस्था आहे. त्यामुळे यामध्ये आंतरराष्ट्रीय नियमानुसार मुधोजी आय हॉस्पिटल यांच्या वतीने ३९ लाख रुपयाची भर घालून  फरांदवाडी येथे स्वतःच्या मालकीच्या सुसज्ज इमारतीमध्ये  व्हिजन सेंटर सर्व सोवि सुविधा युक्त असे नेत्र रुग्णालय उभा राहिले आहे ही  निश्चितच आनंदाची बाब असल्याचे प्रतिपादन डॉ. शेखर कोवळे  यांनी केले.

    मुधोजी लायन्स आय हॉस्पिटलच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये डॉ. कोवळे बोलत होते. याप्रसंगी मुधोजी लायन आय हॉस्पिटलचे अध्यक्ष लायन अर्जुन घाडगे, सचिव लायन चंद्रकांत कदम, खजिनदार लायन जगदीश करवा, लायन जगजीवन गर्वालिया, लायन भोजराज नाईक निंबाळकर, लायन रणजीत निंबाळकर, लायन सुहास निकम, लायन मंगेश दोशी, लायन विशाल शहा इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

    यावेळी बोलताना डॉ. कोवळे म्हणाले की, आता या नेत्र रुग्णालयामध्ये नेत्रपटल स्कॅन मशीन, नेत्रपट फोटो मशीन, डोळ्याची सोनोग्राफी मशीन, काचबिंदू निदान मशीन,  स्लिट लॅम्प, ऑटो केरेटो रिफ्रॅक्टोमीटर, ॲपलनेशन  टोनोमीटर, ए स्कॅन मशीन, लेन्स मीटर इत्यादी आधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे  सांगून कोवळे म्हणतात आज पर्यंत मुधोजी नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून जवळपास ३ लाख २६  हजार ५२० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून यामधून ५१ हजार ५०० शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने ३७ हजार ५०० इतक्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या असून १४ हजार  शस्त्रक्रिया अल्पदान दरात करण्यात आल्या असल्याची माहिती देऊन डॉक्टर कोवळे म्हणतात  भविष्यात आता या रुग्णालयाच्या माध्यमातून आधूनिक शस्त्रक्रिया करण्यात येणार असून यासाठी अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरची निर्मिती केली आहे.

    अशा प्रकारे येणाऱ्या नेत्र रुग्णांना अतिशय चांगल्या व सर्व सुविधा आम्ही उपलब्ध करून  दिल्या असून "जनतेची सेवा हेच ब्रीद वाक्य" घेऊन भविष्यातही हे मुधोजी लायन आय हॉस्पिटल फलटण हे रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज असेल अशी अपेक्षा बाळगतो असेही शेवटी शेखर कोवळे म्हणाले.

    प्रास्ताविकात मुधोजी लायन आय हॉस्पिटलचे अध्यक्ष लायन अर्जुन घाडगे यांनी आजपर्यंतच्या नेत्र रुग्णालयाच्या  प्रवासाची माहिती दिली, यावेळी ते म्हणाले आंतरराष्ट्रीय संघटनेचे कोट्यावधी रुपयाचे अनुदान प्राप्त करून घेताना खऱ्या अर्थाने डॉ. शेखर कोवळे यांचे खूप मोलाचे मार्गदर्शक झाले, त्याचबरोबर या व्हिजन सेंटरचे नूतनीकरण मुंबई स्थित वास्तू विशारद सौ. झंकना कोवळे यांनीही विना मोबदला आम्हाला सर्व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले, तसेच हॉस्पिटलसाठी लागणारी जागा लायन जगदीश करवा यांनी विना मोबदला उपलब्ध करून दिली, या सर्वांच्या मुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुदान आम्ही प्राप्त करून शकलो व या हॉस्पिटलची निर्मिती करू शकलो याबद्दल त्यांनी डॉक्टर शेखर कोवळे, लाईन जगदीश करवा यांचे मनापासून आभार मानले.

No comments