फलटण येथे पासपोर्ट सेवा केंद्राची मागणी : खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांची केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे मागणी
फलटण हे सातारा जिल्ह्यातील वेगाने विकसित होणारा भाग असून, येथील शैक्षणिक संस्थांमुळे हजारो विद्यार्थी स्थानिक आणि आसपासच्या ग्रामीण भागांतून उच्च शिक्षणासाठी येतात. परदेशातील शिक्षण, इंटर्नशिप आणि नोकरीच्या संधींसाठी पासपोर्टची गरज भासते. मात्र, सध्या सातारा जिल्ह्यात केवळ एकच पासपोर्ट सेवा केंद्र असून,जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून केंद्रांपर्यंत प्रवास करणे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरते. याशिवाय, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमान्त गावांतील नागरिकांनाही फलटण जवळ असल्याने येथील केंद्राचा लाभ होईल.
भेटीप्रंसगी खासदार मोहिते-पाटील यांनी सांगितले की, फलटण येथे नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यास स्थानिक नागरिकांना सुविधा मिळेल आणि विद्यमान केंद्रांवरील ताण कमी होईल. यामुळे पासपोर्ट सेवांचा लाभ घेणे अधिक सुलभ आणि गतिमान होईल. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या भेटीमुळे फलटण आणि परिसरातील नागरिकांमध्ये नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
No comments