Breaking News

प्रति वर्षाप्रमाणे दि.१ जुलै रोजी पालखी तळ स्वच्छता अभियान - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

Palkhi Base Cleaning Campaign on July 1st - Shrimant Sanjeevraje Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२९ जून २०२५ - संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा, विमानतळ, फलटण येथून बरडकडे मार्गस्थ झाल्यानंतर पालखी तळाची स्वच्छता ही जबाबदारी गेल्या अनेक वर्षापासून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध संस्था संघटना आणि नागरिकांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते.

    यावर्षीही मंगळवार दि.१ जुलै रोजी सकाळी ०८ वाजता पालखी तळ स्वच्छतेची मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत फलटण एज्युकेशन सोसायटीचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी तसेच श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.,फलटण, कृषि उत्पन्न बाजार समिती, फलटण, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघ लि.,फलटण, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक, श्रीमंत सईबाई महाराज महिला सहकारी पतसंस्था, नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटिज ट्रस्ट, फलटण, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस येथील अधिकारी, कर्मचारी, सभासद शेतकरी तसेच बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया फलटण शाखा, क्रेडाई फलटण शाखा आणि शहर व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, फलटणकर नागरीक या मोहिमेत सहभागी होणार असल्याची माहिती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

    फलटण नगर परिषद आणि अन्य संस्थांच्या माध्यमातून पालखी तळाची स्वच्छता आज करण्यात आली आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतानाच मुख्य पालखी तळाशिवाय विमानतळाच्या आतील बाजूला कंपाऊंड लगत असलेले प्लास्टिक पिशव्या, पेपर ग्लास व अन्य कचरा संकलित करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन ही मोहिम त्यादृष्टीने काम करणार असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

No comments