Breaking News

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप

Distribution of aid to farmers affected by heavy rains

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २६ जून २०२५ - मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे व नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. पावसामुळे शेती वाहून जाणे, फळबागांचे नुकसान, घरांची पडझड, घरात पाणी शिरणे, तसेच पशुधन हानी अशा विविध प्रकारचे मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांनी सोसले. या पार्श्वभूमीवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व आमदार सचिन पाटील यांच्या पुढाकाराने नुकसानग्रस्तांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात आला. शासनाकडून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने मदतीचे वाटप करण्यात आले.

    फलटण येथील तहसील कार्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात या मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार सचिन पाटील, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, नायब तहसीलदार गुंजवटे, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, शिवसेना तालुकाध्यक्ष नानसो इवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राहुल निंबाळकर, भाजप तालुकाध्यक्ष अमित रणवरे, तुकाराम शिंदे व नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही मदत दिलासा देणारी ठरत असून भविष्यातही प्रशासन व लोकप्रतिनिधी मिळून पीडितांसाठी कार्यरत राहतील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

No comments