Breaking News

फलटणमध्ये प्रथमच कॅन्सर रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया ; MJPJAY-PMJAY योजनेतून लाखो रुपयांचा उपचार मोफत

First successful surgery on cancer patient in Phaltan; Free treatment worth lakhs of rupees from MJPJAY-PMJAY scheme

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २४ ऑगस्ट २०२६ : फलटण शहर व तालुक्यातील गरजू रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून, फलटणमध्ये प्रथमच कॅन्सर रुग्णावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

    श्रीमंत महाराजा मालोजीराव सिल्व्हर ज्युबली हॉस्पिटल, फलटण आरोग्य मंडळ फलटण, लाईफ लाईन हॉस्पिटल फलटण तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने ही शस्त्रक्रिया लाईफ लाईन हॉस्पिटल, फलटण येथे यशस्वीरीत्या पार पडली.

    ठाकुरकी, ता.फलटण, जि.सातारा येथील सौ.बाळाबाई नारायण शिंदे यांना कॅन्सर – CA Tongue असल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर Hemiglossectomy ही शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णावर आवश्यक तपासण्या व उपचार करुन शस्त्रक्रिया करण्यात आली.

    या संपूर्ण उपचार प्रक्रियेत डॉ.संजय राऊत, डॉ.मेघना बर्वे, डॉ.सागर गांधी व डॉ.पार्श्वनाथ राजवैद्य यांच्या मार्गदर्शनाचे विशेष योगदान लाभले. तसेच फलटण येथील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ.बी.के.यादव यांचे चिरंजीव व वेस्टर्न इंडिया कॅन्सर केअरचे डॉ.इंद्रजीत बी.यादव, डॉ.सानिका कुलकर्णी व डॉ.जॉर्जिना ढालवाले यांनी कॅन्सरची ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

    शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी ओ.टी.सहाय्यक श्री.विवेक सपकाळ तसेच लाईफ लाईन हॉस्पिटलच्या संपूर्ण स्टाफने विशेष सहकार्य केले.

    या रुग्णाच्या उपचारासाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (MJPJAY-PMJAY) अंतर्गत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यासाठी  सहाय्यक श्री.आमोद रुपनवर व श्री.तुषार देशपांडे यांनी विशेष सहकार्य केले. त्यामुळे रुग्णावर करण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या शस्त्रक्रिया व उपचारांचा खर्च योजनेच्या माध्यमातून पूर्णतः मोफत करण्यात आला.

    या संपूर्ण प्रक्रियेसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, फलटणचे उपजिल्हाप्रमुख व तालुका प्रमुख श्री.राहुल चंद्रकांत गावडे यांनी विशेष पुढाकार घेत रुग्णाला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे गरजू रुग्णाला अत्यंत महागडी कॅन्सर शस्त्रक्रिया व उपचार मोफत मिळणे शक्य झाले.

    फलटण तालुक्यातील गरजू रुग्णांना विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ सुलभ पद्धतीने मिळावा आणि त्यांना उपचारासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने महाराष्ट्र राज्याचे मा.विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे मा.चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या विशेष सहकार्य व मार्गदर्शनातून फलटण येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

    कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवरील उपचार अत्यंत खर्चिक असतात. मात्र केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात उपचार मोफत मिळू शकतात. त्यामुळे फलटण तालुक्यातील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व पात्र रुग्णांनी या योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

    “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” या भावनेतून महाराष्ट्राचे लाडके मा.मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री.एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख श्री.मंगेश चिवटे साहेब,  पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख श्री.अनिल मोरे साहेब यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील अधिकाधिक गरजू रुग्णांना योग्य उपचार, मार्गदर्शन व शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्यरत राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

No comments