Breaking News

घरात आलेल्या दुर्मिळ ‘काळतोंड्या’ सापाचा सुरक्षित बचाव ; साप नैसर्गिक अधिवासात मुक्त

Rare 'black-tongued' snake found in house rescued; Snake released into natural habitat

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २४ ऑगस्ट २०२६ : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वाघोशी येथील एका घरामध्ये साप आल्याने याबाबत नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण या संस्थेशी संपर्क करण्यात आला. माहिती मिळताच संस्थेचे प्रतिनिधी धीरज भोसले हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

    घटनास्थळी पोहोचल्यानंतर पाहणी केली असता सदर साप हा दुर्मिळ ‘काळतोंड्या’ (Dumeril’s Black-headed Snake) असल्याचे निदर्शनास आले. संस्थेच्या प्रतिनिधींनी सापाचे सुरक्षितपणे बचाव कार्य केले. सापाला कोणतीही इजा होऊ न देता त्याची संस्थेकडे नोंद करण्यात आली आणि त्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले.

    काळतोंड्या सापाची ओळख

    काळतोंड्या किंवा कृष्णशीर्ष साप याचे वैज्ञानिक नाव Sibynophis subpunctatus असून हा पूर्णपणे बिनविषारी, लाजाळू आणि शांत स्वभावाचा साप आहे. शरीराचा रंग फिकट तपकिरी, चॉकलेटी किंवा करड्या रंगाचा असून त्याचे काळ्या रंगाचे डोके हे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

    हा साप काही विषारी सापांसारखा दिसत असल्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे साप दिसला म्हणून घाबरून त्याला मारण्याऐवजी तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे.

    निसर्गातील महत्त्व

    काळतोंड्या सापाचा अधिवास प्रामुख्याने ओलसर भाग, पालापाचोळा, दगड किंवा लाकडांच्या खाली तसेच मातीमध्ये आढळतो. तो प्रामुख्याने संध्याकाळी व रात्री सक्रिय असून लहान कीटक, गांडुळे, पाली, सरडे व सापसुरळ्या यांसारखे जीव खातो.

    त्यामुळे स्थानिक परिसंस्थेतील अन्नसाखळी आणि नैसर्गिक संतुलन राखण्यात या सापाचे महत्त्वाचे योगदान आहे.

    नागरिकांना आवाहन

    घरामध्ये किंवा लोकवस्तीमध्ये साप आढळल्यास त्याला मारू नका किंवा स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नका. सुरक्षित अंतर ठेवून प्रशिक्षित सर्पमित्र, वन विभाग किंवा वन्यजीव बचाव पथकाशी संपर्क साधावा.

No comments