श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी केली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५ जून २०२५ - अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांनी मौजे विडणी, सोनवडी खुर्द, साखरवाडी व फडतरवाडी (ता. फलटण) या परिसरांना भेट दिली.
विडणी गावातील श्रीकांत हायटेक नर्सरीचे मालक श्री. चंद्रशेखर लाड यांच्या नर्सरीला झालेल्या नुकसानाची त्यांनी खास पाहणी केली. या वेळी श्रीराम कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे तसेच अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. नर्सरीतील झाडे, प्लास्टिक संरचना आणि पायाभूत सुविधा यांना मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.
यावेळी श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी शेतकरी, व्यावसायिक व नागरिकांना धीर देत शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. "या संकटात मी तुमच्यासोबत आहे. नुकसानग्रस्तांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे," असे त्यांनी सांगितले.
या दौऱ्यात त्यांनी विविध गावांतील नागरिकांच्या अडचणी ऐकून घेतल्या व प्रशासनाशी समन्वय साधून मदतकार्य त्वरीत सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
No comments