अतिवृष्टी काळात फलटण तालुक्यातील 116 कुटुंबे सुरक्षित स्थळे हलवली
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ मे २०२५ : फलटण तालुक्यामध्ये दिनांक 24 आणि 25 मे रोजी पडलेल्या अतिवृष्टीमुळे फलटण शहर आणि ग्रामीण भागामध्ये बिकट परिस्थिती निर्माण झालेली होती. फलटण शहरातून वाहणाऱ्या बाणगंगा नदीला तसेच ग्रामीण भागातील अनेक ओढ्यानाल्यांना पूर आलेले होते.
खबरदारीचा उपाय म्हणून फलटण शहरातून शनी नगरभागातून सुमारे 40 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. त्याशिवाय मौजे खुंटे येथील हनुमान नगर परिसरातून 28 कुटुंबे, मौजे हणमंतवाडी येथील 15 कुटुंबे, मौजे गोखळी पाटी येथील 12 कुटुंबे, मौजे मुरूम येथील 10 कुटुंबे, मौजे सरडे येथील 11 कुटुंबे यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. मौजे सस्तेवाडी येथील एक कुटुंब पाण्याने वेढलेल्या अवस्थेत होते त्यासाठी राष्ट्रीय आपत्ती सुरक्षा दल फलटण येथे दाखल झाले होते. तथापि दल दाखल होण्यापूर्वीच पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने सदर कुटुंब सुरक्षित बाहेर पडले.
त्याशिवाय मौजे दुधेबावी आणि मौजे भाडळी खुर्द या दोन ओढ्याच्या मध्ये अडकलेल्या खाजगी वाहनातील परगावातील अंदाजे 50 व्यक्ती (15 महिला व 15 लहान मुले यांच्यासह) यांची रात्री राहण्याची आणि जेवण्याची सोय प्रशासनातर्फे यांच्यातर्फे करण्यात आली. तसेच मौजे मिर्ढे आणि मौजे जावली या दोन कोड्यांच्या मध्ये अडकलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामार्गाच्या बसमधील सुमारे 64 प्रवाशांची रात्री राहण्याची आणि जेवण्याची सोय देखील प्रशासनातर्फे करण्यात आली.
फलटण शहरातील मलटण परिसराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे वाहून गेली होती परंतु फलटण नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचारी यांनी शर्तीने 24 तासांमध्ये सदरची पाईपलाईन दुरुस्त करून सर्व शहराचा पाणीपुरवठा चालू केला.
No comments