वक्तृत्व ही 'शब्दभक्तीयोग' साधना आहे- प्रा.डॉ.प्रभाकर पवार
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२४ - वक्तृत्व ही कला असली तरी ती 'शब्दभक्तीयोग' साधना आहे,असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रभाकर पवार यांनी मधोजी महाविद्यालय,फलटण येथे वक्तृत्व स्पर्धेच्या अध्यक्षपदावरून केले.प्रमुख उपस्थितीत प्राचार्य प्रो. डॉ.पी.एच.कदम,सकाळ कला शाखाप्रमुख प्रा.डॉ.अशोक शिंदे होते.
वादविवाद स्पर्धा समिती व श्रीमंत शिवाजीराजे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा समिती आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष,मुधोजी महाविद्यालय फलटण यांनी आयोजित केलेल्या "महाविद्यालय अंतर्गत वक्तृत्व स्पर्धाहा२०२५",या स्पर्धेच्या अध्यक्षपदावरून प्रा.डॉ.प्रभाकर पवार बोलत असताना पुढे म्हणाले,चांगल्या वक्तृत्वासाठी संकोच व न्यूनगंड बाजूला सरला पाहिजे.स्पर्धकाला शब्दांशी खेळता आले पाहिजे. शब्दांशी झुंजताना आपल्या वक्तृत्वातून चांगले विचार,संदेश देत असतानाच देहबोलीतून वातावरण निर्मिती करता आली पाहिजे. शब्दसामग्रीसाठी वाचन,चिंतन, स्वसंवाद,बहुश्रुतता व साधना ही गरजेची आहे.शब्दांनी लोकांना जिंकता येते.असे म्हटले जाते की, "ज्याच्याकडे गाथा गाळा व शब्दांचा मळा आहे,त्याला समाजात कशाचीही ददात पडत नाही.यासाठी 'शब्दभक्तीयोग' साधना अत्यंत महत्त्वाची असून,त्यातून चांगले वक्ते तयार होतील.असेही प्रा.डॉ.प्रभाकर पवार यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी स्पर्धकांनी सहभाग घेऊन आपले विषय मांडले.स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ.सौ.सरिता माने व प्रा.कु.ज्योत्स्ना बोराटे यांनी काम पाहिले.स्पर्धेमध्ये कु.वैष्णवी शेंडे, कु.अनुष्का काकडे व कु.माया कांबळे यांनी प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. स्पर्धेचे संयोजन प्रा.शैला क्षीरसागर यांनी केले.प्रा.विशाल गायकवाड, प्रा.फिरोज शेख, प्रा.कु.सावंत यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले.शेवटी प्रा.फिरोज शेख यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.
No comments