आता फलटणसाठी पूर्णवेळ मोकळा आहे ; फलटणचा आगामी आमदार हा भाजपाचा असेल - रणजितसिंह नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. ६ - आगामी विधानसभा निवडणुकीत फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून देण्याचा निर्धार व्यक्त करतानाच आता पूर्ण वेळ फलटण येथे थांबून गेल्या ५ वर्षाप्रमाणे फलटण - कोरेगाव मतदार संघाचा सर्वांगीण विकास गतिमान करण्याची ग्वाही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
हॉटेल निसर्ग, सुरवडी, ता. फलटण येथे आयोजित भाजप पदाधिकारी, कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन करताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, सातारा जिल्हा परिषद माजी सदस्या ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, फलटण नगर परिषद माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, धनंजय साळुंखे पाटील, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, विक्रमसिंह भोसले, भाजप तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, शहराध्यक्ष अनुप शहा, युवानेते रणजितसिंह भोसले,फलटण विधानसभा प्रभारी सचिन कांबळे पाटील, सुशांत निंबाळकर यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार असताना पूर्ण मतदार संघाचा विचार करावा लागत असल्याने सर्व ६ विधानसभा मतदार संघातील विकास कामे, सर्वसामान्यांच्या अपेक्षा, तेथील विविध कार्यक्रम यासाठी वेळ देताना साहजिकच फलटण साठी पूर्ण वेळ देता आला नाही, परंतू आता फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघासाठी पूर्णवेळ मोकळा आहे आणि केंद्र व राज्यात आपली भाजपची सरकारे आहेत आणि ती आगामी काळातही राहणार असल्याने फलटणच्या सर्वांगीण विकासात कोठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट शब्दात दिली.
माढा लोकसभा मतदार संघ निवडणूकित आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केले, त्यांच्यासोबत यापुढेही कार्यरत राहणार असल्याचे आवर्जून सांगताना ज्यांनी आपल्यासोबत गद्दारी केली त्यांना कधीही क्षमा करणार नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटणच्या राजे गटाकडे गेल्या काही वर्षांपासून कोणतेही सत्तेचे पद नसल्याने अस्वस्थ असलेली ही मंडळी फलटण, माण, सांगोला तालुक्याचे हक्काचे पाणी बारामतीला देवून पुन्हा पद मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तथापि फलटणचे हक्काचे पाणी आपण अन्यत्र कोठेही जावू देणार नाही, त्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी आपण मागे हटणार नसल्याचे प्रतिपादन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात केले.
फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गाव, वाडी वस्तीवर जाऊन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक नवीन मजबुत फळी तयार करण्यासाठी आणि त्या माध्यमातून संपूर्ण मतदार संघातील विकास गतिमान करणे आणि लोकांच्या अपेक्षा जाणून घेऊन त्यांच्या पूर्ततेसाठी कार्यरत राहण्याची ग्वाही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली.
फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेने आपल्याला गत निवडणुकीत लोकसभेत पाठवून कामाची संधी दिली, यावेळीही १७ हजारांचे मताधिक्य दिले असून फलटणचा सुपुत्र म्हणून येथील जनतेने आपल्यावर केलेले अलोट प्रेम कधीही विसरणार नसल्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीमध्ये आपण कार्यरत राहणार आहोत. आपल्या कार्यकर्त्यांनी मनामध्ये कोणताही शंका न आणता, खचून न जाता, जिद्दीने कार्यरत रहावे, मी कायम तुमच्यासोबत आहे, आणि फक्त दोन महिने वाट बघा तुम्हाला नक्कीच चांगली बातमी मिळेल याचे सूतोवाच करताना लोकसभा निवडणुकीपूर्वी आपण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला माढा मतदार संघात जो कोणी अधिकृत उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याची ग्वाही दिली होती, मात्र इतर उमेदवारांवर भाजप नेतृत्वाचा विश्वास नसल्याने त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्याचे यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रल्हादराव साळुंखे पाटील, विश्वासराव भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली.
No comments