गल्लीतल्या नेत्याने राजे गटाची काळजी करु नये - प्रितसिंह खानविलकर
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२८ : राजेगटावर कायम तोंडसुख घेणार्या मलठणमधील गल्लीतल्या नेत्याने राजे गटाला उद्देशून उपस्थित केलेला सवाल निरर्थक असून, त्यांनी आपल्या गटाच्या भवितव्याचा विचार करावा, विनाकारण राजेगटाची काळजी करु नये, असा उपरोधिक टोला राजे गटाचे कट्टर समर्थक प्रितिसिंह खानविलकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये लगावला आहे.
लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान राजेगटाने भाजप उमेदवाराच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेवरुन महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस राजेगटावर कारवाई करणार का? असा सवाल माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी उपस्थित केला होता. त्याला प्रतिउत्तरादाखल प्रितसिंह खानविलकर यांनी वरील विधान केले आहे.
राजेगटाने घेतलेली भूमिका आणि त्याचे परिणाम याचा विचार करण्यासाठी राजेगटाचे नेतृत्त्व समर्थ आहे. आता लोकसभा निवडणूकीचा निकाल जवळ आला आहे. आपल्या उमेदवाराचा पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने ते सैरभैर झाले आहेत. त्यामुळे त्यांनी राजेगटाची काळजी न करता भविष्यात संभाव्य पराभवानंतर त्यांच्या गटाचे काय होईल? याचे विचारमंथन त्यांनी करावे असेही प्रितसिंह खानविलकर यांनी नमूद केले आहे.
No comments