Breaking News

बुद्ध जयंती मिरवणुकीत पोलिसांचा हस्तक्षेप; PI वर कारवाईची मागणी, बौद्ध बांधवांची संतप्त प्रतिक्रिया

Police intervention in Buddha Jayanti procession; Demand for action against PI, angry reaction from Buddhist community

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ मे २०२६ - बुद्ध जयंती निमित्त १ मे २०२६ रोजी फलटण शहरात काढण्यात आलेल्या शांततापूर्ण मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपावरून वाद निर्माण झाला असून, सॅम संबंधितांची अनुचित व मनमानी हस्तक्षेपाबाबत चौकशी करावी तसेच त्यांच्या बेकायदेशीर हस्तक्षेप, गैरवर्तन, जातीय भेदभाव व अनुसूचित जातींवरील अत्याचाराबाबत फौजदारी कारवाई करण्याची मागणी तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समिती, फलटणच्या वतीने करण्यात आली आहे.

    तक्रारीनुसार, मिरवणूक शिस्तबद्ध व कायद्याच्या चौकटीत सुरू असताना रात्री १० नंतरचा वेळ संपल्याचे कारण देत पोलीस निरीक्षकांनी अचानक हस्तक्षेप करून डीजेवरील कमी आवाजातील बुद्ध वंदना तसेच पारंपरिक वाद्ये बंद करण्याचे आदेश दिले. मिरवणूक संपण्यासाठी अवघा काही वेळ शिल्लक असतानाही ती थांबवून नागरिकांना घरी जाण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    शंकर मार्केट परिसरात घडलेल्या या प्रकारात काही नागरिकांना धरपकड करण्याचा प्रयत्न झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे. यावेळी पोलिसांकडून पदाधिकाऱ्यांशी अर्वाच्य व धमकीखोर भाषेत संवाद साधण्यात आल्याचा तसेच जातीय स्वरूपाची अपमानास्पद वक्तव्ये केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    या घटनेमुळे महिलांमध्ये व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्याऐवजी पोलिसांच्या कारवाईमुळे परिस्थिती चिघळल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच इतर धार्मिक कार्यक्रमांना सवलत दिली जात असताना बौद्ध व आंबेडकरी कार्यक्रमांवरच निर्बंध लावले जात असल्याचा दुजाभावाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे.

    या प्रकरणी बौद्ध समाजाने उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच राज्याच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर करून संबंधित पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम तसेच भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

No comments