Breaking News

फलटण शहरात चक्री - मटका - जुगार जोरात ; फलटण पोलीस गांधारीच्या भूमिकेत

Chakri - Matka - Gambling in full swing in Phaltan city; Phaltan police in the role of Gandhari

    फलटण  (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ मे २०२६ - सध्या फलटण शहरात चक्री - मटका - जुगार सर्रास सुरु आहे. या चक्री - मटका - जुगार - गुटखा - दारू पायी शेकडो कुटुंबीयांचे संसार उद्‌ध्वस्त होत आहेत. ओपन क्लोजने शहर झोपत नाही, याकडे पोलिसांचे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत असल्याची चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. तर अवैध धंद्यांना शहर पोलिसांचा वरदहस्त असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.

    अगोदरच गोरगरीब जनता हाताला काम नसल्यामुळे आर्थिक अडचणीत आलेली असताना चक्री - मटक्याने चटका लावला आहे. घरातील काहीही विकून किंवा व्याजाने खासगी सावकारांचे पैसे घेऊन, अनेकजण चक्री - मटक्याचे आकडे लावीत आहेत. यामुळे हजारो कुटुंबांचे संसार उद्‌ध्वस्त होत आहेत. या गंभीर प्रकाराकडे पोलिसांनी तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी फलटणकर नागरिकांतून होत आहे.

    शहरातील नवी मंडई परिसरातील नगरपालिकेच्या  जागेत अनेक गाळे आहेत त्या ठिकाणी खुलेआम मटका खेळ बुकिंकडून घेतला जातो.  तर शहरातील अनेक ठिकाणी चक्री चालू आहे, तसेच काही पानपट्टी दुकानात  सर्रास मटका घेतला जात आहे. मटका खेळण्यासाठी शहर व खेड्यापाड्यातील नागरिक येथे गर्दी करीत आहेत.

    फलटण शहरात जागोजागी पोलीस बंदोबस्त असूनही अवैध धंद्यांना उत आला आहे.  मटका, चक्री, जुगार जोरात चालू आहे. हातभट्टीची दारू विक्री होत आहे, मोबाईल चोरी, भुरट्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही. अवैध धंद्यांमुळे गोरगरिबांचे संसार मात्र उद्‌ध्वस्त होत आहेत. बेरोजगारीमुळे अनेक तरुण या व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत. यामुळे शहरात गुन्हेगारी वाढत असून अवैध धंद्यांना शहर पोलिसांचा वरदहस्त असल्याची चर्चा शहरात दबक्या आवाजात सुरु आहे.

No comments