महिलेच्या गळ्यातील ६२ हजारांचे मिनी गंठण हिसकावले
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२९ : कोळकी, मालोजीनगर परिसरात सायंकाळच्या वेळी घडलेल्या धक्कादायक प्रकारात एका महिलेच्या गळ्यातील सुमारे ६२ हजार रुपये किमतीचे मिनी गंठण दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. जयश्री बापुराव साळुंखे (वय ४६, व्यवसाय – शिक्षक, रा. मालोजीनगर, काळकी, ता. फलटण) या दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.५५ वाजण्याच्या सुमारास नागनाथ फ्लोअर मिलसमोर भाजी खरेदी करून घरी जात होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या जवळ येत अचानक झडप घातली.
यातील मागील सीटवर बसलेल्या इसमाने मास्क घातलेला असून त्याने साळुंखे यांच्या गळ्यातील अंदाजे ६२ हजार रुपये किमतीचे मिनी गंठण हिसकावून पळ काढला. हा प्रकार इतक्या वेगात घडला की पीडित महिलेला काही समजण्याच्या आतच आरोपी फरार झाले.
या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments