विडणीत सरपंचांना शिवीगाळ ; पंचायत समिती पराभवाचा राग सरपंचांवर
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२८ - फलटण तालुक्यातील विडणी गावात सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी उत्तमराव शेंडे यांच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने गावातील वातावरण तापल्याचे चित्र आहे.
तक्रारदार सागर कांतीलाल अभंग, सरपंच, ग्रामपंचायत विडणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. 28 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास विडणी गावातील हायस्कूलसमोरील साखीम परिसरात ही घटना घडली.
यावेळी उत्तम राजाराम शेंडे (रा. विडणी) यांनी “तू उभी केलेली ग्रामपंचायत शीट लागणार नाही, तू पडणार आहेस, तुझे इथं काही काम नाही,” अशा शब्दांत शिवीगाळ करत दमदाटी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, आज विडणी गावात ग्रामपंचायत पोटनिवडणूक सुरू असून, याच पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. पंचायत समिती निवडणुकीतील पराभवाची सल मनात ठेवून उत्तमराव शेंडे यांनी शिवीगाळ केली असल्याचे सरपंच सागर अभंग यांनी सांगितले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 351(2) व 352 अन्वये अदखलपात्र रजिस्टर क्र. 503/2026 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.
घटनेमुळे गावातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

No comments