डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पिंपरद येथे दि. १४ एप्रिल रोजी रक्तदान शिबिर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती पिंपरद (ता. फलटण) यांच्या वतीने व शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरद ता. फलटण येथील सिध्दार्थनगर येथे दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिराचे उदघाटन फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती पिंपरदचे अध्यक्ष निरज मोरे यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ही केवळ एक दिवस साजरी नकरता वर्षभर विविध सामाजिक उपक्रम, विविध शिबीरे, विद्यार्थी मार्गदर्शन शिबीरे, विविध व्यावसायिक प्रशिक्षण शिबीरे यांच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्यक्रमाने भरगच्च असेल असे उपाध्यक्ष विकास मोरे यांनी म्हटले आहे. तर डीजे व फटाकेमुक्त भीमजयंती या अभिनव संकल्पनेतून समाजाला वेगळा संदेश दिला जाणार आहे. डीजे व फटाक्या सारखा नाहक खर्चाला फाटा देत याच बचतीच्या पैशातून मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समाज निर्मिती हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल असा विश्वास संस्थेचे सचिव विक्रांत मोरे यांनी व्यक्त केला आहे.
No comments