Breaking News

तळागाळात काम करणाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व देऊ - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

Give representation to grassroots workers in local bodies - MP Ranjitsinh Naik Nimbalkar

रामोशी समाजाचे ६० टक्के मतदान खा. रणजीतसिंह यांना होईल - दौलतनाना शितोळे 

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३१- लोकसभा निवडणुकीनंतर सर्वप्रथम रामोशी समाजाचे जे प्रश्न असतील, गावातील रस्त्याचे प्रश्न, तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न सोडवले जातील त्याच बरोबर तळागाळात काम करणाऱ्या तरुणांना राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला जाईल. इतर समाज जसे पुढे गेले, त्याप्रमाणे मागे राहिलेल्या आपल्या समजाला पुढे आणण्याचे  काम पुढील ५ वर्षांमध्ये करणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

    जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने फलटण येथे माढा लोकसभा बैठक खासदार रणजीत हे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित केली होती. याप्रसंगी खा. रणजितसिंह बोलत होते. कार्यक्रमास भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील,  धनंजयदादा साळुंखे पाटील, अभिजीतभैय्या नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोक जाधव, सचिन अहिवळे, नाना आडके, बाळासाहेब मदने, दत्ता चव्हाण, राहुल मदने, बापू चव्हाण, दत्ताभाऊ चव्हाण, विनोद जाधव, सुधीरभाऊ, डॉ. सुभाष गुळवे व इतर उपस्थित होते.

    पुढे बोलताना खा. रणजितसिंह म्हणाले, जय मल्हार क्रांती संघटनेला महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. दौलतनाना यांचे काम मी मागील काही वर्षांपासून पाहत आहे, तळागाळातुन लोकांचे संघटन बांधणारे नेतृत्व म्हणून दौलत नाना यांच्याकडे आज पाहिले जाते, त्यांच्याकडे संघटन कौशल्य आहे.  विखुरलेला रामोशी समाज आज या संघटनेच्या माध्यमातून एकत्रित आणण्याचे काम होत आहे. या समाजाचे काही प्रश्न प्रलंबित असतील तर ते, येणाऱ्या काळात सोडवले जातील असे सांगतानाच, भविष्यात दौलतनाना हे महाराष्ट्र सरकार मध्ये कोणतीतरी जबाबदारी सांभाळताना दिसतील असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

    गेल्या १५ वर्षा पासून आपण आपली भूमिका मांडतोय, रामोशी समाजाच्या व्यथा मांडतोय त्याला न्याय देण्याचे काम भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे, त्यामुळे आपल्याला भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे लागणार असल्याचे सांगतानाच या माढा मतदारसंघांमध्ये सर्वेनुसार रामोशी बेडर समाजाचे १ लाख ५९ हजार मतदान आहे. त्यातील ६० टक्के म्हणजेच १ लाख मतदान रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना होईल असे आश्वासन जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी दिले.

    माढा मतदार संघात प्रत्येक तालुक्यात २ सभा जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने घेणार आहोत, माढा मतदार संघात रामोशी समाजातून रणजितसिंह यांना जास्तीत जास्त मतदान झाले पाहिजे असे आवाहन करून,  रामोशी समाजाकडे वतनाच्या जमिनी होत्या परंतु काही गावगुंडांकडून त्या जमिनी बळकवल्या आहेत. आता महामंडळ झाले आहे परंतु त्याठिकाणी जातीचा दाखला लागतो, मात्र रामोशी समाजाला जातीचे दाखले मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत तरी रणजितसिंह यांनी जातीचे दाखले मिळण्याची व्यवस्था करावी, त्याचबरोबर समाज बांधवांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न करावा,  वाड्या वस्ती मधील रस्ते करावेत अशी मागणी यावेळी दौलतनाना शितोळे यांनी केली.

No comments